कॉंग्रेस, शिवसेना, भाजपमध्ये तिरंगी लढत 

अविनाश काळे 
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

उमरगा - पुनर्रचनेत नव्याने झालेल्या कुन्हाळी गटात कॉंग्रेस, भाजप व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. खासदार पुत्राच्या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, शेवटच्या क्षणी होणारा "गेम' गटाचे चित्र पालटवू शकते. 

उमरगा - पुनर्रचनेत नव्याने झालेल्या कुन्हाळी गटात कॉंग्रेस, भाजप व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. खासदार पुत्राच्या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, शेवटच्या क्षणी होणारा "गेम' गटाचे चित्र पालटवू शकते. 

कुन्हाळी गटातील बहुतांश गावे कॉंग्रेसच्या विचारांची असली, तरी निवडणुकीतील नव्या खेळीने पक्षापेक्षा व्यक्‍तीकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून कॉंग्रेसकडून प्रकाश आष्टे निवडणुकीची तयारी केली होती. सुरक्षित गटाच्या प्रयत्नापासून उमेदवारी मिळविण्यापर्यंत श्री. आष्टे यांना संघर्ष करावा लागला; तर दगडू मोरे, आश्‍लेष मोरे यांना उमेदवारी न मिळाल्याने मोरे घराण्यावर झालेल्या अन्यायाचा रोष तलमोडकरांमध्ये दिसतो आहे. सोळा गावांचा समावेश असलेल्या गटात श्री. आष्टे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत मतदारांचा पाठिंबा मिळविण्यावर भर दिला आहे; मात्र पक्षांतर्गत कलह दूर करून मताधिक्‍य मिळविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. खासदारपुत्र किरण गायकवाड यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. प्रत्येक गावातील मतदारांच्या गृहभेटीवर त्यांनी भर दिला आहे. स्वतः खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे मतदारांशी संपर्क साधत असून, युवा सेनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत येथून विजय प्राप्त करण्याच्या इर्षेने प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. मूलभूत समस्यांची विचारणा मतदार करीत असल्याने त्याची पूर्तता करण्याचे आश्‍वासन लोकप्रतिनिधींना द्यावे लागत आहे. भाजपचे संताजी चालुक्‍य यांची फिल्डिंगही जोरात आहे. उमेदवारी निश्‍चित होण्यापूर्वीच त्यांनी गटातील गावांत बैठका घेऊन जनमतासाठी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागात सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. त्याचा फायदा कितपत होतो हे पाहावे लागेल. 

"सस्पेन्स' कायम! 
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, कॉंग्रेसचे आमदार बसवराज पाटील, राज्याचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी या गटात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दगडू मोरे यांची निर्णायक भूमिका "भगव्या'साठी महत्त्वाची ठरू शकते; मात्र त्याबाबत स्पष्टता दिसत नाही. खासदार पुत्रासाठी शेवटच्या क्षणी होणारा "गेम' निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे तूर्त या गटातल्या निकालाचे "सस्पेन्स' कायम आहे. 

गणातही तिरंगी लढत 
गटासाठी जशी चुरशीची लढत होत आहे तशीच स्थिती कुन्हाळी, तलमोड गणात होत आहे. कुन्हाळी गणात सचिन पाटील (कॉंग्रेस), दत्तात्रय सुरवसे (भाजप), बलभीम होगाडे (शिवसेना) यांच्यात, तर तलमोड गणात नागम्मा चिंचोळे (कॉंग्रेस), मुक्कुबाई चंदुकापुरे (शिवसेना) व बाई बोकले (भाजप) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. गाव व जातीनिहाय मतविभागणीतून गट, गणात मताधिक्‍य घेण्याचा डाव आखला जात आहे.

Web Title: Congress, Shiv Sena and BJP fight