कॉँग्रेस, शिवसेनेचा नांदेडमध्ये रक्तदानासाठी पुढाकार

अभय कुळकजाईकर
Monday, 30 March 2020

नांदेडमध्ये कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी तर कॉँग्रेसचे विठ्ठल पावडे यांनी रक्तदान शिबिर घेऊन राष्ट्रीय कार्यास मदत केली.

नांदेड - एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतानाच दुसरीकडे रक्ताचा तुठवडा मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. त्यामुळे हा रक्ताचा तुठवडा कमी करण्यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत युवक कॉँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी तसेच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

हे ही वाचा - समाजभानाचे ‘प्रोजेक्ट कर्तव्य’
 
‘संकटकाळी माझं योगदान’
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचे परिणाम सर्वच घटकावर होत आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने कुणालाही घराबाहेर पडायचे आदेश नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्त पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत आणि संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत श्री. पावडे यांनी ‘ संकटकाळी माझं योगदान’ हा उपक्रम हाती घेतला.

११० जणांचे रक्तदान
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्री. पावडे यांनी पुढाकार घेऊन ‘संकटकाळी माझं योगदान’ हा उपक्रम राबवित तब्बल ११० हून अधिक जणांचे रक्तदान करुन घेतले आहे. नांदेडमधील तरुणांना रक्तदानासाठी त्यांनी विनंती केली. स्वतः रक्तदान करून सुरुवात केली. तीन दिवसात तब्बल ५० जणांनी रक्तदान केले आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - लॉकडाऊन : अशी बहरली दापशेडची नैसर्गिक शेती

३१ मार्चपर्यंत उपक्रम
दरम्यान, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तो रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन जीवाची बाजी लावून काम करत आहे. कर्तव्य बजावत आहेत. याच अनुषंगाने आपणही देशहितासाठी आपला सहभाग द्यावा, रक्तवाचून कुणाचेही प्राण जाऊ नयेत यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘संकटकाळी माझं योगदान’ या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पावडे यांनी केले आहे. हा उपक्रम येत्या ता. ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. श्री हुजुर साहिब ब्लड बँक येथे येऊन कुणीही रक्तदान करु शकते. शिवाय रक्तदान त्याची येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही विठ्ठल पावडे यांनी सांगितले.

शिवसेनेचाही पुढाकार
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुठवडा जाणवत असल्यामुळे नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, दिंगबर कल्याणकर, प्रणव बोडके, केशव कल्याणकर, प्रविण देवणे, शरद कदम, सोपान कल्याणकर, गोपाल इंगोले, जर्नादन कल्याणकर, शिव कल्याणकर, दीपक कल्याणकर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कल्याणकर यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress, Shiv Sena initiative to donate blood in Nanded, nanded news