दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या प्रचाराला सुरवात 

अविनाश काळे 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (ता. चार) येणेगूर (ता. उमरगा) येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाला.

जाहीर सभेतून नेतेमंडळींनी कॉंग्रेसचे विचार, आतापर्यंत केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा ऊहापोह करून केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर हल्ला चढविला. निवडणूक प्रचार सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांतील मरगळ दूर करून उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. 

उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (ता. चार) येणेगूर (ता. उमरगा) येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाला.

जाहीर सभेतून नेतेमंडळींनी कॉंग्रेसचे विचार, आतापर्यंत केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा ऊहापोह करून केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर हल्ला चढविला. निवडणूक प्रचार सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांतील मरगळ दूर करून उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. 

माजी राज्यमंत्री तथा आमदार बसवराज पाटील यांनी प्रचार सभेचे नियोजन केले होते. सभेला उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपला केले लक्ष्य! 
केंद्र व राज्य सरकारने आश्‍वासनांची भुरळ घालून सत्ता मिळवली; मात्र प्रत्यक्षात नागरिकांचा प्रत्येक क्षेत्रात अपेक्षाभंग केल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकुरकर यांनी कॉंग्रेस पक्षाची परंपरा, विचार, केलेल्या प्रगतीचा ऊहापोह केला. एक संयमी व्यक्‍तिमत्त्व म्हणून श्री. चाकुरकर यांच्याकडे पाहिले जाते. प्रचार सभेत आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाने केलेले कार्य अत्यंत जोशपूर्ण शैलीत ते सांगत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकार धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यापेक्षा केवळ प्रसिद्धीत नंबर वन असल्याची टीका केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका करून नागरिकांनी या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला पराभूत करण्याचे आवाहन केले. माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत ग्रामीण विकासाची जाणीव असलेले प्रतिनिधी गेले तरच नागरिकांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले. आमदार मधुकरराव चव्हाण यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसचा तिरंगा फडकेल असा विश्‍वास व्यक्‍त केला. 

कॉंग्रेसची सत्ता कायम राहील... 
केंद्र व राज्य सरकारच्या भूलथापांना नागरिक कंटाळले आहेत. उस्मानाबाद व अनेक पंचायत समित्यांच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी ग्रामीण विकासाची कामे केली आहेत. उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे कॉंग्रेसला मिळणारे समर्थन या निवडणुकीतही कायम राहील, असा विश्‍वास व्यक्‍त करून आमदार बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत सक्रिय काम करण्याचा संदेश दिला. 

कार्यकर्त्यांत उत्साह आणि संयम 
प्रचार सभेला चार तास विलंब होऊनही कार्यकर्ते, मतदार अत्यंत संयमाने सभेच्या ठिकाणी थांबून होते. नेते मंडळींच्या भाषणात कोठेही व्यत्यय न येऊ देता कार्यकर्ते शांत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कॉंग्रेसने कार्यकर्त्यांत नवा उत्साह निर्माण केला. 

Web Title: Congress Start campaign