त्याने गमावला डोळा, त्याला एक लाख रुपये द्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

शेतात काम करताना डोळा निकामी झाल्यानंतर अपघात विमा नाकारणाऱ्या कंपनीने शेतकऱ्याला एक लाख रुपयांची रक्कम द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

उस्मानाबाद : शेतात काम करताना डोळा निकामी झाल्यानंतर अपघात विमा नाकारणाऱ्या कंपनीने शेतकऱ्याला एक लाख रुपयांची रक्कम द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. मंचाचे अध्यक्ष किशोर वडणे, सदस्य मुकुंद सस्ते, शशांक क्षीरसागर यांनी मंगळवारी (ता.11) हा निकाल दिला आहे. 

पिंपळगाव-डोळा (ता. कळंब) येथील शेतकरी सतीश शहाजी टेकाळे आठ जानेवारी 2016 रोजी सकाळी शेतात गेले होते. थंडीचे दिवस असल्याने त्यांनी शेकोटीचा आधार घेतला. त्याच वेळी शेकोटीमधील एक दगड फुटून थेट सतीश यांच्या डोळ्यावर आदळला. यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.

क्लिक करा - औरंगाबादची मोठी बातमी

डोळ्याची शस्त्रक्रियाही झाली; मात्र त्यांनी दृष्टी गमावली. त्यांचा डोळा पूर्णपणे निकामी झाला. यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केला. मात्र विमा कंपनीने विमा देण्यास नकार दिला. त्यामुळे शहाजी यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात विमा मिळावा म्हणून तक्रार दाखल केली. 

सेक्सबद्दल महिला स्वतःहून का बोलत नाहीत

यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील अपंगत्वाचे प्रमाणपत्र, खासगी रुग्णालयातील उपचाराची कागदपत्रे आदी माहिती मंचात दाखल केली. यावरून मंचाने शेतकरी सतीश टेकाळे यांना एक लाख रुपयांची रक्कम देण्याचे विमा कंपनीला आदेशित केले आहे; तसेच तक्रारीच्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी 10 हजार रुपयांची मदत देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार सतीश टेकाळे यांच्याकडून ऍड. एस. एस. रितापुरे, यांनी तर विमा कंपनीकडून आर. एच. भिंगारे, डी. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumer Court Order To Compensate Farmer Osmanabad News