पन्नास एकर जमीन विकली; पण निवडणूक लढली 

Babasaheb shinde
Babasaheb shinde

घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे. बापकळ (ता. जालना) येथील बाबासाहेब शिंदे हे या अवलियाचे नाव असून, ते तेवीसाव्या वेळी घनसावंगीतून मैदानात उतरले आहेत. 

63 वर्षीय बाबासाहेब शिंदे यांनी आतापर्यंत निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास 50 एकर शेती पणाला लावल्याचे बोलले जाते. घरची स्थिती तेव्हा सधन, जनसंपर्कही दांडगा असल्याने वर्ष 1978 मध्ये कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारीही देऊ केली होती, असे ते सांगतात; मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. राजकीय तत्त्व जपत अपक्ष निवडणूक लढविण्याचा शिंदे यांचा निर्धार ठाम होता. त्यातून वर्ष 1980 मध्ये पहिल्यांदा बदनापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यानंतर प्रत्येक वेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा धडका लावत शिंदे यांनी आतापर्यत एकाच वेळी जास्त मतदारसंघांतून उमेदवारी दाखल करण्याचा अनोखा विक्रमही केला आहे. 
शिंदे यांनी 39 वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमदेवारी दाखल करून नशीब आजमाविले. त्यासाठी स्वतःची पन्नास एकर शेतीही विकल्याचे बोलले जाते; परंतु अजून तरी त्यांचे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकलेले नाही. निवडणूक लढविण्याची शिंदे यांची हौस त्यांच्या कुटुंबीयासाठी देखील डोकेदुखी ठरली. यावरून त्यांच्या कुटुंबात देखील वाद होत होते. त्यामुळे बाबासाहेब शिंदे यांनी निवडणूक लढविण्याच्या इच्छेपोटी घर सोडून मंदिरात राहणे पसंत केले आहे. 

निवडणुकीत उतरण्याचा धडाका 
वर्ष 1980 मध्ये बदनापूर विधानसभा अपक्ष, 1985 मध्ये जालना व बदनापूरमध्ये निवडणूक लढविली त्यात त्यांना 95 व 1051 मते मिळाली. 1990 मध्ये जालना, बदनापूर, परतूर, अंबड, भोकरदन या पाचही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांना अंबडमधून 1660 मते, जालनामधून 566, बदनापूरमधून 991, परतूरमधून 638 मते मिळाली होती. 1995 मध्ये बदनापूर, 1999 मध्ये बदनापूर, 2004 मध्ये बदनापूर, 2009 मध्ये घनसावंगी, 2014 मध्ये भोकरदनमधून निवडणूक लढविली होती. अशी 13 वेळा विधानसभा निवडणूक त्यांनी लढविली. तर 1984, 1981, 1991, 1996, 1998, 2004, 2009, 2014 मध्ये त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा, तर 1991 मधून परभणी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. अशा 22 निवडणूक लढविल्या आहेत. यंदाच्या 2019 च्या विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांना आता किती मते मिळतात, याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. 

वर्ष 1978 मध्ये कॉंग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, तरुण हा आपला मतदार असून तोच आपल्याला निवडून देईल, असा आत्मविश्‍वास मला होता. यावेळी मी पैसे नसल्यामुळे निवडणूक लढविणार नव्हतो; पण मित्रमंडळींनी पैसे जमा करून अर्जासाठी लागणारी अनामत रक्कम भरली. त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. 
बाबासाहेब शिंदे, 
- उमेदवार, घनसावंगी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com