टिकटॉकवर वादग्रस्त व्हिडिओ; बीड जिल्ह्यात तरुणास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

उमराई (ता. अंबाजोगाई) येथील तरुणाने सोशल मीडियाचा वापर करून दोन धर्मांत तेढ निर्माण करून एकोपा टिकण्यास बाधक असा व्हिडिओ तयार करून टिकटॉकवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तरुणास अटक करण्यात आली आहे. 

किल्लेधारूर (जि. बीड) -  येथील पोलिस ठाणेअंतर्गत उमराई (ता. अंबाजोगाई) येथील तरुणाने सोशल मीडियाचा वापर करून दोन धर्मांत तेढ निर्माण करून एकोपा टिकण्यास बाधक असा व्हिडिओ तयार करून टिकटॉकवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तरुणास अटक करण्यात आली आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील तरुणाने टिकटॉकवर दोन धर्मांत तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक एकोप्याला बाधा पोचवणारे व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा सोशल मीडिया सेलला कळाली. सोशल मीडिया सेलने मंगळवारी (ता. नऊ) मिळालेल्या माहितीवरून तत्काळ दखल घेतली. यावरून धारूर पोलिस हद्दीतील उमराई येथे जाऊन पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांनी शहानिशा केली.

हेही वाचा - माजलगाव नगरपालिकेतील १८२ सफाई कामगारांवर संक्रांत

सदरील तरुणाने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ टिकटॉकवर वायरल केल्याचे आढळून आले. यामुळे धारूर पोलिसात श्रीनाथ बालासाहेब केंद्रे यास दहा तारखेला ताब्यात घेतले. पोलिस शिपाई परमेश्वर वखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव करत आहेत. सोशल मीडियावर सध्या पोलिसांची करडी नजर असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial video on TickTock; Youth arrested in Beed district