उमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा! मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल

अविनाश काळे
Wednesday, 2 December 2020

भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी एकरी पन्नास हजार ते एक लाखाचे उत्पन्न देणाऱ्या कोथिंबरला सध्या एकरी दहा हजार रुपयेही मिळेनात.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी एकरी पन्नास हजार ते एक लाखाचे उत्पन्न देणाऱ्या कोथिंबरला सध्या एकरी दहा हजार रुपयेही मिळेनात. झालेला खर्चही पदरात पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यात सिंचनाखाली येणाऱ्या शेतीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. मध्यंतरी पावसाच्या कमतरतेमुळे बागायतीचे क्षेत्र कमी झाले होते.पाण्याची उपलब्धता असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात कोथिंबीरची शेती केली.

ती बऱ्याच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली. तुगांव शिवारात जवळपास पन्नास एकर क्षेत्रात कोथिंबीर होती. त्यावेळी त्याची मागणी वाढल्याने दरही चांगला मिळाला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीरच्या उत्पन्न घेण्यासाठी आर्थिक, शारीरिक मेहनत घेतली. मात्र मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा फोल ठरली असून लागवडीचा खर्चही निघत नाही. गुंजोटी शिवारातील अस्लम मुजावर यांनी एक एकर कोथिंबीरचे क्षेत्र केले. त्यासाठी बारा हजाराचा खर्च झाला. कोथिंबर बहरात आली. बाजारपेठ चांगली मिळेल याची प्रतिक्षा केली. मात्र बाजारभाव गडगडल्याने कोथिंबीर खरेदीसाठी व्यापारीच भाव खाताहेत.

व्यापाऱ्याने जाग्यावर येऊन फड पाहिला आणि वीस ते पंचवीस रुपये कॅरेट दराने मागणी केली. साधारणतः सव्वाशे कॅरेट उत्पन्न मिळणार याची हमी आहे. परंतू प्रतिकॅरेटचा दर एकदमच घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकरी बारा हजार खर्च झाला. आता एकरी पाच ते सात हजार रुपये मिळताहेत. त्यामुळे श्री. मुजावर यांनी व्यापाऱ्यांशी संपर्कच करण्याचे नाकारले आणि धने बियासाठी फड राखीव ठेवला. अनेक शेतकऱ्यांनी अगदी कमी दरात कोथिंबीरची विक्री केली, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यातून किमान लागवडीचा खर्च निघेल. या अपेक्षेने कोथिंबीरचा फड धने बियासाठी ठेवल्याचे चित्र दिसत आहे.

 

शेतकऱ्यांना शेती उत्पन्नातून फायदा कमी आणि अधिक तोटा सहन करावा लागतोय. मध्यंतरी कोथिंबीरला चांगला भाव होता. मात्र आता तो घसरल्याने केलेला खर्चही पदरात पडत नाही. फायदा तर नाही किमान खर्च तर निघेल या अपेक्षेने कोथिंबीर रानावरच धने बियासाठी ठेवावे लागले.
- अस्लम मुजावर, शेतकरी गुंजोटी

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coriander Get Low Price, Farmers Unhappy Umarga Osmanabad News