
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदान केले आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदान केले आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा घेत कोण निवडणूक जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे. भाजपच्या नेतृत्वाने शिरीष बोराळकर यांना जिंकून आणण्याची तंबी स्थानिक नेत्यांना दिल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसले. मुळात मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा जनसंघापासून भाजपकडे होता. तो नंतर राष्ट्रवादी पक्षाने आपल्याकडे खेचला.
गेल्या दोन वेळेस पक्षाचे सतीश चव्हाण पदवीधरचे आमदार आहेत. यंदा वाढलेल्या मताचा फायदा कोणाला होणार आहे? हे उद्या होणाऱ्या मत मोजणीनंतर कळणारच आहे. शैक्षणिक संस्था आजघडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्याचा साहजिकच फायदा सतीश चव्हाण यांना होणार आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पाठीमागे फक्त पक्षीय ताकद असल्याचे दिसते. निवडणुकीच्या काळात मराठवाड्यात मतदारांशी भेटगाठी घेणे हे कितपत त्यांना फायद्याचे ठरणार आहे? त्या तुलनेत सतीश चव्हाण आणि अपक्ष उमेदवार रमेश पोकळे हे पदवीधरांचे प्रश्न घेऊन लढताना दिसले आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची ही पहिली निवडणूक आहे. यात त्या-त्या पक्षाने चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग नोंदविला आहे. त्याचा फायदा त्यांना होईल. पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे हे अपक्ष म्हणून उभे आहेत. ते ही कोणाचे मतदान घेतात हे पाहण्यासारखे राहणार आहे. एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारची धोरणे पदवीधरांना किती आवडली आहेत? राज्यातील कोणतेही निवडणूक असो तिथे ‘कास्ट फॅक्टर’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तोही या निवडणुकीत दिसला आहे.