esakal | कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश  
sakal

बोलून बातमी शोधा

korona

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामधूनही जनमानसामध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावामधील स्थलांतर करणाऱ्या मजूर व कामगारांना गावाकडे परत आल्यानंतर आरोग्य तपासणी करून घेतल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. यामुळे काही ठिकाणी गावी परत येणारे कामगार, मजूर व गावकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत.

कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश  

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामधून कामानिमित्त स्थलांतर केलेल्या नागरिकांना गावबंदी करण्यात येत असल्यामुळे अनेक गावांमधून वादाचे प्रकार घडत आहेत. आरोग्य तपासणी करून आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, यामध्येही आरोग्य तपासणीकरिता पाठवण्यात आलेले काही नागरिक परस्पर नातेवाईकांकडे गेल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामधूनही जनमानसामध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व प्रशासनाकडून करण्यात येणारी जनजागृती आता ग्रामीण भागामधील शेवटच्या नागरिकापर्यंत पोचली असल्याचे चित्र आहे. या आजाराचा सामना करण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु, कामासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे स्थलांतर करणाऱ्या ग्रामीण भागातील कामगार व मजूर गावाकडे परतले आहे. 

हेही वाचाVideo : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

तपासणी करून घेतल्यानंतरच गावात प्रवेश

कामगार व मजुरांच्या माध्यमातून गावामध्ये हा आजार पोहोचू नये, याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.  पुयना, वारंगा मसाई, सोडेगाव, कळमकोंडा येथील गावकऱ्यांनी गावच्या वेशीवरच नागरिक व तरुणांची २४ तासाची गस्त बसविली आहे. गावात कुठल्याही नागरिकाला प्रवेश दिला जात नाही. गावामधील स्थलांतर करणाऱ्या मजूर व कामगारांना गावाकडे परत आल्यानंतर आरोग्य तपासणी करून घेतल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे.

इतरत्र निवारा घेतल्यामुळे संशय

यामुळे काही ठिकाणी गावी परत येणारे कामगार, मजूर व गावकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. सिंदगी येथील गावी परतणाऱ्या मजुरांना आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर आरोग्य तपासणी करून आल्याचे कागदपत्र सरपंच व पोलिस पाटील यांना दाखवविले. त्यानंतरच या मजुरांना गावात प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांनी आरोग्य तपासणी न करता इतरत्र नातेवाईकाकडे निवारा घेतल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संशय व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी

गावकऱ्यांचा जागता पहारा

ग्रामीण भागामधून गावकऱ्यांनी गावाची वेस बंद करत जागता पहारा ठेवल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस व आरोग्य तपासणी संदर्भातील कागदपत्रे पाहूनच गावात प्रवेश दिला जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुणे, मुंबई येथून परतलेल्या १२८ महिला नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जर्मनीहून परतलेल्या एका व्यक्तीला होम क्‍वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

loading image