कोरोनाबाधित फरारी तिसरा कैदी जेरबंद...परभणी जिल्ह्यातील प्रकार

गणेश पांडे 
Saturday, 5 September 2020

कोविड सेंटरमधून पळालेल्या दोन कैद्यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि हिंगोली जिल्ह्यातील बासंबा येथून बुधवारी (ता.दोन) ताब्यात घेतले आहे. आता फरारी झालेले तिन्ही कैदी परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.  

सेलू ः परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड कक्षातून फरारी झालेल्या तिसऱ्या कोरोनाबाधित कैद्याला पोलिसांनी शुक्रवारी (ता.चार) सेलू शहरातून ताब्यात घेतला. शहरातील एका ठिकाणी हा कैदी पूर्वी कामासाठी होता, अशी माहिती सेलू पोलिसांना होती. 

सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी त्याची खातरजमा केली. तो शहरातील एका हॉटेल परिसरात असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी कैद्यास ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे, जसपालसिंग कोटतीर्थवाले. पोलिस कर्मचारी विलास सातपुते, ज्ञानदेव पौळ, श्रीहरी मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, कोविड सेंटरमधून पळालेल्या दोन कैद्यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि हिंगोली जिल्ह्यातील बासंबा येथून बुधवारी (ता.दोन) ताब्यात घेतले आहे. आता फरारी झालेले तिन्ही कैदी परभणी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.  

हेही वाचा - ‘लम्पी स्किन’ मुळे जनावरांच्या तपासणीवर भर, परभणी जिल्ह्यात धोका...

सागवानची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त 
चारठाणा ः वनपरिक्षेत्रातून सागवानची अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर सावरगाव- गारखेडा (ता. जिंतूर) शिवारातून महसूल प्रशासनाच्या मंडळाधिकारी व तलाठी या दोन महिला अधिकाऱ्यांनी जप्त केला. चारठाणाच्या मंडळाधिकारी श्रीमती अतकरे व जोगवाडा सजाच्या तलाठी श्रीमती चाकोरे या दोन महिला अधिकारी बुधवारी (ता.दोन) सायंकाळी कामानिमित्त जोगवाडामार्गे सोनापूरकडे जात होत्या. त्यावेळी भरधाव ट्रॅक्टर जिंतूरमार्गे जात होते. सागवानने भरलेले ते ट्रॅक्टर महिला अधिकाऱ्यांनी अडवले. विचारपूस केली तेव्हा ट्रॅक्टरचालक गडबडला. या महिला अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा त्याच्याकडे कुठलाही कागद आढळला नाही. महिला अधिकाऱ्यांनी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधला व माहिती दिली. ट्रॅक्टर ताब्यात घेतला. जिंतूर तहसीलदारांनी गुरुवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करत त्या ट्रॅक्टरचालकाविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. तेव्हा वन विभागाचे अधिकारी शिंगाडे, ऋषिकेश चव्हाण, घुगे, कोलेवाड यांनी ट्रॅक्टरचालकाविरोधात कारवाई केली. 
दरम्यान, चारठाणा, ब्राम्हणगाव, हनवतखेडा, सावरगाव, गारखेडा वगैरे परिसरातून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. तसेच अवैध वाहतूकही होत आहे. त्याकडे वन विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले असून, महसूल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ही कारवाई झाली, हे मात्र विशेष. 

हेही वाचा - हिंगोलीतील बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना अटक 

सेलूतील मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेत चोरीचा प्रयत्न 
सेलूः शहरातील पाथरी रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरातील मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेत चोरीचा प्रयत्न गुरुवारी (ता.तीन) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आला. मात्र, बँकेची तिजोरी चोरट्यांना फुटली नसल्याने बँकेतील रोख रक्कम शाबूत राहिली. 
चोरट्यांनी मात्र सीसीटीव्ही कॅमेरे तोडून एचडीआर (मेमरी कार्ड) पळवल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यवर्ती बँकेतील शाखाधिकारी एस.जी.मगर यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. बँकेच्या तिजोरीतील दोन लाख ऐंशी हजार ४१९ रुपये रक्कम तिजोरी न फुटल्यामुळे चोरट्यांना पळवता आली नाही. चोरट्यांनी मुख्य शटर तोडून आत प्रवेश केला व तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा प्रयत्न फसला. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथकास पाचारण करण्यात केले होते. घटनास्थळी पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-bound fugitive third prisoner jailed ... Parbhani district type, Parbhani news