Corona Breaking, परभणीत तीन रुग्णांचा मृत्यू, ६८ पॉझिटिव्ह

गणेश पांडे
Tuesday, 18 August 2020

जिल्ह्यात रॅपिड टेस्ट सर्वच तालुक्याच्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. त्यातून बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. तसेच परभणीत मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर ६८ पॉझिटिव्ह जिल्ह्यात आढळले.  

परभणीः जिल्ह्यात कोरोनाबाधित तिघांचा आज मृत्यू झाला. त्यात पेडगाव (ता.परभणी) येथील ५५ वर्षीय, परभणी शहरातील शंकर नगरातील ५५ वर्षीय, लक्ष्मी नगरमधील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांची संख्या ८३ झाली आहे. आज आणखी ६८ बाधितांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या १ हजार ६७० झाली आहे. 

परभणी महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.१८) घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. शहरातील १३ सेंटर्सवर व्यापारी विक्रेत्या, विक्रेते व नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या. या केंद्रांवर ९२२ जणांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये ८९६ टेस्ट निगेटिव्ह आल्या तर २६ जण पॉझिटिव्ह आढळले. या व्यक्तींना शहरातील विविध ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटर्समध्ये हलवण्यात आले; तसेच सदरील व्यक्तींच्या घर व परिसराचे निर्जंतुकीकरण, घराला बॅरिकोटिंग, कुटुंबीयांच्या टेस्ट व विलगीकरण आदी प्रक्रियादेखील सुरू करण्यात आल्या. 

हेही वाचा - नांदेडला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अडीचहजारावर

जिंतूरला मंगळवारी ३९ व्यापाऱ्यांची टेस्ट 
जिंतूरला मंगळवारी (ता.१८) चौथ्या दिवशी ३९ व्यापाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये सर्व व्यापारी निगेटिव्ह आले आहेत. शहरातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात शनिवार (ता.१५) पासून टेस्ट घेण्यात येत असून अद्यापपर्यंत एकूण ३०८ जणांची अॅंटीजेन टेस्ट घेण्यात आली. यात दहा व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मिळून १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

हेही वाचा - साज चढला, घुंगरे बांधली...पण बैल मिरविलाच नाही

दहा हॉटेल व लॉजिंगधारकांना क्वारंटाइन सेंटर परवानगी 
परभणी शहरातील दहा हॉटेल व लॉजिंगधारकांना जिल्हा प्रशासनाने सीसीसी आणि क्वारंटाइन सेंटरकरिता पेड बेसिसवर मंगळवारी (ता. १८) एका आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. त्यामध्ये हॉटेल साई पॅलेस लॉजिंग, द फर्न रेसिडेन्सी, कस्तुरी लॉजिंग, हॉटेल नीरज लॉजिंग, लक्ष्मी लॉजिंग, धनलक्ष्मी लॉजिंग, रुचिका पॅलेस, हॉटेल तुलसी, हॉटेल गुलमोहर व हॉटेल रोहित इन यांना सीसीसी व क्वारंटाइन सेंटरकरिता पेड बेसिसवर मान्यता बहाल करण्यात आली आहे. या हॉटेलचालकांनी महापालिका आयुक्तांकडे कागदपत्रे सादर करावीत व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने बजाविले आहेत. 

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - १६७०
आजचे बाधित - ६८
आजचे मृत्यु - तीन
एकूण बरे - ६९९ 
उपचार सुरु असलेले - ८८८ 
एकूण मृत्यु - ८३

संपादन ः राजन मंगरुळकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking, death of three patients in Parbhani, 68 positive, Parbhani News