Corona Breaking ; हिंगोलीत एकाचा मृत्यू, ६१ पॉझिटिव्ह 

corona
corona

हिंगोली ः जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका ५१ वर्षीय पुरुषाचा गुरुवारी (ता.तेरा) मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी सांगितले. तर जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण एकसष्ठ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी छतीस रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टद्वारे व पंचवीस रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. तर बारा रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १०३७ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६८६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३४० रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि एकूण अकरा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला. 

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (ता.१३) खासगी वैद्यकीय व्यावसायिक उपाहारगृह व स्वीटमार्टचालक अशा १४२ व्यापारी व नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये दहा जणांना आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कोरोनाचे ग्रहण 
हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लागलेले कोरोनाचे ग्रहण काही पिच्छा सोडत नाही. पुन्हा गुरुवारी विभाग प्रमुखासह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आजदेखील कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येत होता. मागील महिन्यात आरोग्य विभागातील दोघा डॉक्टरांसह, कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण विभागातील अधिकारी, कर्मचारी असे एकूण चाळीस जणांना सेनगाव तालुक्यातील कवठा येथे क्वारंटाइन केले होते; मात्र सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पाच-सहा दिवस कार्यालय सील केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण इमारत सॅनिटाईज्ड करून विभागप्रमुखासह दहा कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले होते. 
त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पुन्हा विभागप्रमुखांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याने तीन दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मोजकेच कर्मचारी येऊन काम करत होते. कोरोनाची चांगलीच धास्ती कर्मचाऱ्यांनी घेतली असल्याने गुरुवारी देखील कार्यालयात सामसूम दिसत होती. जिल्हा परिषदेची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी प्रयत्न चालविले जात असताना त्यातच पुन्हा गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह प्रशांत तुपकरी या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना विषाणू काही आरोग्य विभागाचा पिच्छा सोडत नाही की काय, असे दिसून येत आहे. आता पुन्हा आरोग्य विभाग सील करावा लागणार आहे. अगोदरच सीईओ शर्मासह, विभागप्रमुख यांच्यासह काही कर्मचारी होम क्वारंटाइन जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेत पाठ फिरविल्याने जिल्हा परिषद सध्या सलाईनवर आहे. आता तर पुन्हा आरोग्य विभागातील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पुन्हा जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प करण्याची वेळ आली आहे. आता या दोघांच्या संपर्कातील कोण कोण व्यक्ती आले आहेत यांचा शोध घेतला जाणार असून, येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

अँटीजेन टेस्टशिवाय आस्थापना उघडणाऱ्यांवर करणार कारवाई 
कळमनुरी : खरेदी-विक्रीच्या आस्थापना सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपली रॅपिड अँटीजेन तपासणी करावी, तपासणी न करता आस्थापना उघडून व्यापार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिला आहे. 
शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या सर्व आस्थापनामधील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करून घेण्याकरिता आदेशित केले आहे. ही तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र घेतल्याशिवाय संबंधित व्यापाऱ्याला दुकान उघडण्यास व व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने व्यापारी वर्गाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. काही जणांनी याकडे पाठ फिरविली आहे. ज्यांनी तपासणीसंदर्भात प्रमाणपत्र घेतले आहे त्यांना सुरक्षेचे सर्व नियम पाळून व्यापार करता येणार आहे. मात्र, या तपासणीकडे पाठ फिरवणाऱ्या व दुकानाचा परवाना एकाच्या नावावर व तपासणी दुसऱ्याच्या नावावर करून घेणाऱ्या व्यापाऱ्यांची पालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी तपासणी न करता आपली प्रतिष्ठान किंवा आस्थापना उघडून व्यापार करण्याचा प्रयत्न आहे. अशा व्यापारीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिला आहे. 


हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - १०३७ 
आजचे बाधित - ६१ 
आजचे मृत्यु - एक 
एकूण बरे - ६८६ 
उपचार सुरु असलेले - ३४० 
एकूण मृत्यु - ११ 

संपादन ः राजन मंगरुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com