esakal | पायऱ्या, ओटे झाले बसण्यास पोरके... 
sakal

बोलून बातमी शोधा

oote

परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृसिंह) येथे दुकानापुढे असणाऱ्या पायऱ्यांवर कोरोनाच्या धास्तीने कोणी बसू नये म्हणून काळे ऑईल टाकले आहे.

पायऱ्या, ओटे झाले बसण्यास पोरके... 

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी ः पोखर्णी (नृसिंह) (ता. परभणी) येथील ग्रामस्थांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी रस्ते बंद केले असून रस्त्यावरची वर्दळ कमी केली आहे. तसेच घरापुढे व दुकानापुढे असणाऱ्या ओटे, पायऱ्यावर कोणी बसू नये म्हणून काळे ऑईल टाकले जात आहे. यामुळे पायऱ्या, ओटे बसण्यास पोरके झाले की काय? अशी भावना निर्माण होत आहे.   

ग्रामीण भागात ग्रामस्थ जीव ओतून काळजी घेत आहेत. परंतु, बाहेरून येणाऱ्यांमुळे आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. पोखर्णी (ता.परभणी) येथील ग्रामस्थांनीदेखील विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

हेही वाचा - Video - निराधारांना जगण्यासाठी हवाय मदतीचा आधार...

खबरदारी म्हणून गावकरी प्रयत्नात 
पंचक्रोशीमध्ये पोखर्णी हे मुख्य ठिकाण आहे. गावात असणाऱ्या दोन बँकांतील कामकाजाच्या निमित्ताने गावात आजूबाजूच्या गावांतील लोकांची रोजच वर्दळ असते. परंतु, बँक अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांना रोखता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून गावकरी प्रयत्न करीत आहेत. आपापल्या गल्लीतील रस्ते ग्रामस्थ बंद करीत आहेत. घरासमोरील, दुकानाबाहेरील ओट्यांवर कोणी बसू नये म्हणून काळे ऑईल टाकले जात आहे. पोखर्णीकर ग्रामस्थ स्वत:हून खबरदारी घेत आहेत. अनेक ग्रामस्थांनी शेतात मुक्काम हलवला आहे. गावात राहणारे ग्रामस्थदेखील रस्त्यावर फिरणे टाळत आहेत. पोखर्णीकरांच्या विविध उपाययोजनांची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा - Video ; भाजपच्या आंदोलनाला परभणीत राष्ट्रवादीचे असे प्रत्युत्तर 

जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल 
परभणी जिल्हा ग्रीन झोन म्हणून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. आता रेडझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई, पुणे या भागातून येणाऱ्यांची ससंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. परभणीत पुण्याहून आलेला पहिला रुग्ण घरी सुखरूप गेल्यानंतर परभणी जिल्ह्याने ग्रीन झोनमध्ये पाऊल टाकले होते. मात्र, लगेच शेवडी (ता. जिंतूर) येथे मुंबईहून आलेले तीन रुग्ण अढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर परभणीत एक महिला रुग्ण आढळून आली. तसेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे सहा, माटेगाव (ता. पूर्णा) येथे एक, नागठाणा (ता. गंगाखेड) येथे एक, असे रुग्ण आढळून आले. पुन्हा गुरुवारी या रुग्णांची संख्या वाढून २० वर गेली आहे, तर १९ रुग्ण उपचार घेत आहेत.