मंठा येथे कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना 

कृष्णा भावसार
शनिवार, 28 मार्च 2020

मंठा येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुक्यात ग्रामस्तरावर ११२ नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना विषाणू नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दीपक लोणे यांनी दिली आहे. 

मंठा (जि.जालना) - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मंठा येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुक्यात ग्रामस्तरावर ११२ नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना विषाणू नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दीपक लोणे यांनी दिली आहे. 

तालुक्यात शुक्रवारपर्यंत (ता. २७) तीस हजार १०६ घरे सर्वेक्षित करण्यात आली. आतापर्यंत सर्दी, तापाचे ६६४ रुग्ण आढळले असून, त्यांना प्राथमिक उपचार देऊन ते रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक व इतर ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींची संख्या तीन हजार ७४८ असून यापैकी सर्वांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दहिफळ आरोग्य केंद्रात २८, ढोकसाळ आरोग्य केंद्रात २५, पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५४, तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१ असे एकूण १३८ जणांना सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसली त्यांना औषधोपचार देण्यात आला असून होम क्वारंटाइनच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यात परदेशातून आलेल्या दोन व्यक्ती व त्यांच्या सहवासातील तेवीस जणांना कुठेही कोरोना व्हायरसची लक्षणे नाहीत. तरीही त्यांना सक्तीने होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

मंठा येथे पाच संस्थांची क्वारंटाइनसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे अथवा इतर ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींची प्राथमिक तपासणी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरीच थांबावे व बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींनी घरातच वेगळे राहावे, वारंवार साबणाने हात धुवावेत व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोणे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona control room at Mantha