esakal | कोरोना: शेकडो हेक्टरवरील फळबागांवर संकट 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना: शेकडो हेक्टरवरील फळबागांवर संकट 

कोरोना विषाणूचे थैमान सर्वत्र असल्याने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. याचा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. परिपक्क झालेल्या फळबागा जागेवरच सडून जात असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या पिकांचेपंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

कोरोना: शेकडो हेक्टरवरील फळबागांवर संकट 

sakal_logo
By
प्रभाकर बारसे

गिरगाव (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून संचारबंदीमुळे येथील केळी, टरबुज, काशीफळ तोडणीची कामे थांबली आहेत. तसेच शंभर हेक्‍टरांवर केळीच्या बागेतील एक हजार टनपेक्षा अधिक माल परिपक्‍व झाला असतानाही शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून आर्थिक नुकसान होत आहे. 

वसमत तालुक्यातील गिरगाव परिसर हा नेहमीच फळबागासाठी प्रसिद्ध आहे. या भागातून इसापूर व सिद्धेश्चर धरणाचे दोन कालवे गेल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळतो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आल्याने ऊस, केळी, हळद ही नगदी पिके घेतात. यातुन चांगले उत्‍पादन देखील मिळते. अनेक शेतकऱ्यांकडे फळबागा देखील आहेत. 

हेही वाचा कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश

 केळीचे पीक आले तोडणीस 

या वर्षी  गिरगाव मधील शेतकरी गजानन रायवाडे यांच्याकडे पाच हजार केळीची झाडे आहेत. सुभाष रायवाडे यांच्याकडे तीन हजार, देविदास पाटील कऱ्हाळे यांच्याकडे पाच हजार, गोविंदराव नादरे दोन हजार, नामदेव साखरे यांच्याकडे चार हजार केळीची झाडे आहेत. तसेच बहुतांश शेतकऱ्यांकडे सरासरी दोन, तीन व चार हजार केळीच्या कंदाच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या केळीचे पीक तोडणीस आलेले आहे. मारोती नादरे यांनी दहा एकर टरबुजाची लागवड आहे. 

सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी लागू
 
ज्ञानेश्वर, जेठनराव नादरे यांची चार एकर टरबुजाची लागवड आहे. रायवाडी बंधू यांचे जवळपास २५ एकर टरबुजाची लागवड केलेली आहे. गंगाधर नादरे यांनी पाच एकर काशीफळची लागवड केली आहे. या शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी टरबुज, काशीफळ यांची लागवड केली आहे. फळबागातून यावर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. कोरोना विषाणूंचे संकट अचानक उद्भवले. कोरोना विषाणूचे थैमान सर्वत्र असल्याने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.

लाखो रुपयांचे नुकसान

 त्यामुळे सर्व बाजारपेठ बंद आहेत. तसेच व्यापारीही फळबागेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. फळबागा तोडणीला अलेल्या असताना जागेवरच फळे सडून जात आहेत. गिरगावमध्ये शंभर हेक्‍टरांवर केळीच्या बागा आहेत. एक हजार टनपेक्षा अधिक माल परिपक्‍व झाला आहे. मात्र तोडणीअभावी शेतातच आहे. संचारबंदीमुळे व्यापारी केळीचा माल खरेदी करीत नाहीत. अचानक एवढे मोठे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

येथे क्लिक कराकोरोना: शेती कामातही एक मीटरचे अंतर

मोबदला देण्याची मागणी 

एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे शासन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. संचारबंदीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, फळे परिपक्व झालेले असताना तोडणी करता येत नाही. जिवापाड जपलेली फळे जागेवरच सडून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्या आश्रू येत आहेत.