कोरोना: शेती कामातही एक मीटरचे अंतर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

मजूर मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी घरीच हळद काढत आहेत. त्यामुळे घरातील सर्व कुटुंब शेतात जात आहेत. मात्र हळद काढणी करताना देखील काळजी घेतली जात आहे. दोन शेतकऱ्यांत एक मीटरचे अंतर ठेवले जात आहे.

औंढा नागनाथ/ गोजेगाव (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्‍यात सध्या हळद काढणी सुरू आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे शेतात मजूर येण्यास तयार नसल्याने शेतकरी स्‍वतःच कुटुंबीयांसह हळद काढण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र खबरदारी म्‍हणून हळद काढताना देखील दोन शेतकऱ्यांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवले जात आहे.

औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोजेगावसह गोळेगाव, साळणा, येळी, केळी, पार्डी सावळी आदी गावात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तसेच या भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावरील शेतकरी हळदीचे पीक घेतात. सध्या अनेक शेतकऱ्यांची हळद काढणीस आली आहे. 

हेही वाचाVideo : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

कुटुंबीयांची घेताहेत काळजी

मात्र मागच्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. तसेच जमावबंदी देखील आहे. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील काळजी घेतली जात आहे. प्रत्‍येक जण कुटुंबीयांची काळजी घेत आहेत. शहरात व जिल्‍ह्या बाहेर जाणारे रस्‍ते देखील बंद झाल्याने घरीच थांबत आहेत. त्‍याचा परिणाम शेतातील पिकांच्या काढणीवर झाला आहे. सध्या वातावरणात होणारा बदल काढणीस आलेले पीक यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

हळद पीक काढणीस सुरवात

 हळद काढणीस मजूर मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी घरीच हळद काढत आहेत. त्यामुळे घरातील सर्व कुटुंब शेतात जात आहेत. मात्र हळद काढणी करताना देखील काळजी घेतली जात आहे. दोन शेतकऱ्यांत एक मीटरचे अंतर ठेवले जात आहे. दरम्यान, तालुक्‍यात बहुतांश शेतकऱ्यांनी हळद पीक घेतले असून सध्या काढणीस सुरवात झाली आहे. परंतु, कोरोना साथरोग असल्यामुळे कोणीही मजूर घराबाहेर फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

जोराच्या वाऱ्यासह पाऊस 

 दरम्यान, गहू व हरभरा काढणीची देखील अशीच परिस्‍थिती आहे. स्वत: शेतकऱ्यांनाच कामे करावी लागत आहेत. दरम्यान, तालुक्यातील अनेक गावात बुधवारी रात्री जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता मजूर मिळत नसल्याने पुन्हा अडचणीत भर पडली आहे.    

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके आडवी

जादा मजुरी देवूनही मिळेनात मजूर

एका एकरमध्ये हळद लागवड केली. आता शेतातील हळद काढायला आली आहे. मात्र, कोरोना साथरोगामुळे मजूर शेतीची कामे करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. जादा मजुरी देवूनही मजूर येत नाहीत. त्यामुळे आम्ही कुटुंबातील सर्वच सदस्य हळद काढणी करीत आहेत.
- सुभाष गुंगे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: One meter distance from agricultural work