कोरोना इफेक्ट : हिंगोली ऐतिहासिक दसरा महोत्सव रद्द- रुचेश जयवंशी 

राजेश दारव्हेकर
Friday, 25 September 2020

प्रसिद्ध संत खाकीबाबा, संत मानदासबाबा यांच्या संकल्पनेतून हिंगोली येथे दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील रामलीला मैदानावर गेल्या १६६ वर्षापासून दसरा महोत्सव आयोजित केल्या जात आहे.

हिंगोली :  येथील १६६ वर्षांची परंपरा असणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी  कोरोना संकटामुळे रद्द होणार असल्याचे  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  गुरुवारी (ता. २४) सांगितले.

प्रसिद्ध संत खाकीबाबा, संत मानदासबाबा यांच्या संकल्पनेतून हिंगोली येथे दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील रामलीला मैदानावर गेल्या १६६ वर्षापासून दसरा महोत्सव आयोजित केल्या जात आहे. स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवामध्ये प्रसिद्ध रामलीलेसह भव्य प्रदर्शने, कृषी प्रदर्शने, आकाश पाळणे व लहान-मोठ्या नागरिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी असते. तसेच विविध क्रिडा व विविध स्पर्धा,  यात कुस्ती, कब्बडी आदी स्पर्धा घेण्यात येतात. यामुळे घटस्थापने पासून दहा दिलस कार्यक्रमाची रेलचेल असते. म्हैसूरच्या प्रसिद्ध दसर्यानंतर हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध आहे. यामुळे औद्योगिक प्रदर्शनात घटस्थापनेच्या नऊ दिवसात येथे जिल्हाभरासह विविध जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

हेही वाचानांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर
 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली

यावर्षी सध्या येथील रामलीला मैदानाच्या सपाटीकरनाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता. या वर्षी दसरा महोत्सव रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोना संकटामुळे हे कार्यक्रम यावर्षी रद्द

या वर्षी आँक्टोंबर महिन्यात ता.१७ पासून घटस्थापना होणार आहे तर ता. २५ दसरा आहे. या नऊ दिवसात येथे दररोज सायंकाळी रामलीला कार्यक्रम होतात तसेच औद्योगिक  कृषी प्रदर्शनी असते तर दसर्याच्या दिवशी रावन दहन कार्यक्रम असतो यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली जाते यामुळे या दिवशी येथे कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हे कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: Hingoli historical Dussehra festival canceled due to corona- Ruchesh Jayavanshi hingoli news