लातुरात का सुरू झाले ऑनलाइन संगीत प्रशिक्षण..वाचा सविस्तर ..!

latur news
latur news

लातूर, : संगीत ही गुरूमुखी विद्या समजली जाते. पण, विविध अडचणींमुळे परदेशातील किंवा पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना आपल्या गुरूंकडून संगीताचे ऑनलाईन धडे घ्यावे लागतात. आता तीच वेळ कोरोनामुळे लातूरातील आणि त्यातही ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आली आहे. हे शिक्षण घेताना वेगवेगळ्या मर्यादा येत असल्या तरी विद्यार्थी गावात बसून संगीताचे प्राथमिक धडे गिरवण्यात रमले आहेत, असे दिलासादायक चित्र सध्या पहायला मिळत आहे.

इतर विषयांचे शिक्षण, नोकरी यामुळे वेळेची फारशी उपलब्धता नसणे, येण्या-जाण्यात पुष्कळ वेळ वाया जाणे अशा कारणांमुळे मोठ्या शहरांतील अनेक विद्यार्थी घरात बसून ऑनलाईन माध्यमातून संगीताचे शिक्षण घेतात. बऱ्याचदा गुरू भारतात आणि विद्यार्थी परदेशात असे चित्रही ऑनलाईन संगीत शिक्षणात पहायला मिळते. वेगवेगळ्या कारणांमुळे गुरूजवळ बसून संगीताचे धडे गिरवता येणे अशक्य होते. मोठ्या शहरातील हे चित्र आता कोरोनामुळे लातूरसारख्या लहान शहरात आणि पाखरसांगवी, वडवळ नागनाथसह इतर ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

ऑनलाईन संगीत शिक्षणाची सुरवात लातूरमधील दयानंद कला महाविद्यालय आणि शाहू महाविद्यालयाने सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केली आहे. तर शहरातील इतर महाविद्यालयात ही सुविधा येत्या काही दिवसांत लवकरच सुरू होणार आहे. दयानंद महाविद्यालयात प्रा. संदीप जगदाळे हे तबला वादन (तालवाद्य) आणि संगीत शास्त्र तर डॉ. देवेंद्र कुलकर्णी हे गायन शिकवत आहेत.

 तर शाहू महाविद्यालयात प्रा. हरिसर्वोत्तम जोशी हे गायन आणि वादनाचे धडे देत आहेत. यासंदर्भात जोशी म्हणाले, शाहू महाविद्यालयाने स्वत:चे यू-ट्यूब चॅनेल तयार केले आहे. यावर संगीतविषयक क्लीप तयार करून अपलोड केल्या जात आहेत. या क्लिप तयार करण्यासाठी महाविद्यालयात रेकॉडिंग रूम सुरू करण्यात आली आहे. येथे कॅमेरा, ध्वनीक्षेपक उपलब्ध आहे. त्यामुळे घरात बसून क्लिप पाहताना विद्यार्थ्यांना सुर-ताल स्पष्ट ऐकू जातात.

मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत करार

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सहजपणे घेता यावे म्हणून दयानंद महाविद्यालयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीने टीम नावाचे ॲप महाविद्यालयाला दिले आहे. यावर शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांना पाहू शकतात. ते एकमेकांशी संवादही साधू शकतात. या माध्यमातून गायन, वादनाचे धडे सध्या दिले जात आहेत. सध्या गायन शिकविण्यात फारशा अडचणी येत नाहीत. पण, वादन शिकविण्यात काहीशा अडचणी येतात.

कारण, शिकणाऱ्या सर्वच मुलांच्या घरी वाद्य नसतात. त्यामुळे झपताल, दादरा, तीन ताल, कायदे हे वादनातील वेगवेगळे प्रकार नेमके काय आहेत, कुठल्या घराण्यात कशा पद्धतीने वादन केले जाते? यावर अधिक भर दिला जात आहे, असे प्रा. संदिप जगदाळे यांनी सांगितले. कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांनी अशा प्रकारचा पुढाकार घेऊन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हेही कौतूकास्पद आहे, असेही जगदाळे यांनी नमूद केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com