कोरोनाच्या एंट्रीने काढले बीडमधील सिव्हिलच्या कारभाराचे वाभाडे, व्हिडिओच्या चौकशीचे आदेश 

दत्ता देशमुख
Wednesday, 20 May 2020

  • रुग्ण पुण्याला; जिल्हाधिकाऱ्यांना यावे लागले सिव्हिलमध्ये 
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांची निदर्शने 
  • जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा 
  • व्हिडिओच्या चौकशीचे आदेश; दोन डॉक्टरांना शोकॉज 

बीड - कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश लागू करणे आणि उपाययोजना करणे याची जबाबदारी महसूल, ग्रामीण आरोग्य, पोलिस या प्रशासनावर. तर, कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ यंत्रणेवर; पण आतापर्यंत ठीक- ठाक, छान-छान असे निर्माण झालेल्या चित्रावर कोरोनाच्या रुग्णांच्या एंट्रीनेच पाणी फेरले. 

मंगळवारी (ता. १९) बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९वर गेली आहे; पण मंगळवारी आणखी  यातील एका वृद्धेचा मृत्यू व त्यातील सहा रुग्णांनी स्वेच्छेने व परवानगीने पुण्याला जाण्याचा घेतलेला निर्णय आणि जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्ड परिसरातील कोरोनाग्रस्तांचा मुक्त वावर व त्याकडे यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष या सर्व घटनांमुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार उघड झाला आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना येऊन जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांतील भांडणाचा पाढा ऐकावा लागला. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठी यंत्रणा असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलवर संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

रुग्ण स्वत:हून पुण्याला; पण व्हिडिओमुळे कळाले वास्तव 

कोरोनाचे आतापर्यंत जिल्ह्यात १९ रुग्ण झाले असले तरी यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. उर्वरित सहा जणांनी स्वत:हून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र भौतिक सुविधांची गरज असल्याने त्यांनी मागणी केल्याचे सांगितले जाते; पण याचदरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डच्या परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. कोरोनाच्या सुरवातीलाच असे घडत असल्याने आता तरी सावध होण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

अधिकाऱ्यांना निदर्शने करण्याची वेळ का? 

मंगळवारी विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निदर्शने केली. चक्क कोविड वॉर्डमध्ये त्यांनाच पिण्याच्या पाण्याची सोय नाही हा यातील एक तक्रार होती. जर डॉक्टरांनाच पाणी नाही तर... असा प्रश्न आहे. यासह कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना राहण्याची व इतर स्वतंत्र सुविधा असाव्यात अशा जागतिक आरोग्य संघटनेचे निकष आहेत. त्याची सोय केली नसल्याचा मुद्दाही यानिमित्ताने समोर आला. किट व गॉगल याचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टरांनी केली. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार... 

तक्रारींच्या पाढ्यामुळे कठीण काळातले लाडही समोर 

जिल्हा रुग्णालयातील हा बोभाटा समोर आल्यानंतर खुद्द जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा रुग्णालयात आले. जिल्हाधिकाऱ्यांना यावे लागणे तसे गरजेचे असले तरी यामुळे मग येथील वरिष्ठांचे नियंत्रण ढिले असल्याचेही या निमित्ताने समोर आले; पण यावेळी त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी वाचलेल्या तक्रारींच्या पाढ्यामुळे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अशा कठीण काळातही अधिकच लाड होत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले.

कोरोना रुग्णांचे थ्रोट स्वॅब पॅथॉलॉजिस्ट, इएनटी सर्जन किंवा लॅब टेक्निशिअन यांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, पॅथॉलॉजिस्टने अद्याप एखादा थ्रोट स्वॅब घेतला का, असा प्रश्न उपस्थित झाला. भिषकच स्वॅब घेतात हेही समोर आले. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोविड वॉर्डच्या ड्युटी लावलेल्या नाहीत. मग, काही लोकांचे अशा कठीण काळातही अधिकच लाड होताहेत आणि त्यांचे लाड कोण करतेय असा प्रश्न आहे. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

वैद्यकीय अधिकारी म्हणाले आम्हालाही कुटुंबाची काळजी 

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांचे कार्यालय जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षण केंद्रात हलविले; पण कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी केलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी देखील क्वारंटाइन असणे अपेक्षित आहे; पण त्यांची सोय झालेली नाही. यात लक्ष घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे; मात्र जर वरिष्ठ अधिकारी एकदाही कोविड वॉर्डचा राउंड घेत नसतील. स्वत:चे कार्यालय सुरक्षित ठिकाणी नेऊन ते कुटुंबापासून क्वारंटाइन राहत नसतील तर आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी का नको, अशी कैफियतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडली. साधारण एक तासाहून अधिक काळ जिल्हाधिकारी सिव्हिलमध्ये थांबून होते. 

आता तरी कारभार सुधारण्याची अपेक्षा 

सोशल मीडियावरील व्हिडिओ, डॉक्टरांची निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर वैद्यकीय अधिकारी विरुद्ध वरिष्ठ अधिकारी असा रंगलेला सामना फार हितावह नाही. यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार नियंत्रणाबाहेर असल्याचे समोर आले. आता तरी कारभार सुधारण्याची अपेक्षा आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही भरला दम 

दरम्यान, एंट्रीमध्येच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दम भरला. अशा गंभीर परिस्थितीत आंदोलन केले तर गुन्हे दाखल केले जातील, असे सुनावले. त्यानंतर पुन्हा वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांची बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

व्हिडिओची चौकशी; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा 

कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. सांगवी (ता. आष्टी) येथे नातेवाइकांकडे मुंबईहून आलेल्या व नगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सात जणांना कोरोनाची बाधा आढळली. यातील ६५ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर उर्वरित सहा रुग्णांना त्यांच्या विनंतीनुसार सोमवारी विशेष परवानगीने पुण्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जाताना या रुग्णांना संपूर्ण सूचना दिल्या होत्या.

यात कुणी निष्काळजीपणा केला याबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. शिवाय, कोरोना कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही डॉ. थोरात म्हणाले. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना शिवीगाळ व धरणे आंदोलन केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव चिंचोले व डॉ. संजय राऊत या दोघांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या. 

पालकमंत्री मुंडेंकडूनही व्हिडीओ व आंदोलनाची दखल

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाग्रस्त जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकाराची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही दखल घेत हा प्रकार गंभीर असून चौकशीचे आदेश दिले. कोरोना बाधित रुग्णाने असे फिरणे अत्यंत धोक्याचे असून ते इतर कित्येकांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे यामागे नेमका कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे याची चौकशी केली गेली पाहिजे, या गंभीर परिस्थितीत कोणाच्याही निष्काळजीपणाची गय केली जाणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

तसेच डॉक्टरांनी कोरोना वार्ड मध्ये जेवण व पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करत केलेल्या ठिय्या आंदोलनाचीही दखल घेत अशा कोरोना वॉरिअर्सना कुठल्याच सुविधा कमी पडू नयेत अशा सुचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोणत्याही परिस्थितीत निधी किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासू देणार नाही, डॉक्टर्स व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी धैर्याने काम करावे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

जिल्ह्यातील इतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात, क्वारंटाइन सेंटरमध्ये अथवा होम क्वारंटाइन शिक्का असलेली कुणी संशयित, बाधित व्यक्ती इतरत्र फिरताना आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवा. जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोईचे होईल. 
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Entry In Beed Is A Result Of Bad Work Of Civil Medical Administration