शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली

हरी तुगावकर
Monday, 28 September 2020

कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघितले पाहिजे.

लातूर ; ‘‘कोरोना काळात ज्योतिष, गुरू, बाबा, मांत्रिक, अध्यात्मिक लोक, देवधर्माच्या संबंधित सर्वांनीच मैदानातून पळ काढला आहे. मानवी जीवन मौल्यवान असून, प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे. शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघितले पाहिजे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणे शक्य आहे’’, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने झालेल्या ऑनलाइन व्याख्यानात ‘कोरोनाकडून आपण काय शिकावे?’ या विषयावर ते बोलत होते. ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.पाटील म्हणाले, ‘‘राजकीय सजगतेचा अभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्यापेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो. माध्यमे या बाबतीत गांभीर्य जपत नाहीत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच; कोविड केअर सेंटरसह डीएससी, डीएचसीएस फुल्ल

धर्म, प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्त्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या कोरोनावर कशी मात करायची? या एकाच प्रश्नाला भिडले जात आहे. लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे. आपल्याकडे संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो.

आधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन याला डावलून फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा’’. राज्यभरातील समितीच्या कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या त्यालाही विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले, अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली.

मराठवाड्यात तीन लाख २८ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, शेतकऱ्यांना...

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Fear Increase Due Mismanagement Of Governmental System