जालन्यातील कोरोना हॉस्पिटल कार्यान्वित

महेश गायकवाड
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर कष्ट घेत तयार करण्यात आलेले दीडशे खाटांचे स्वतंत्र कोरोना हॉस्पिटल मंगळवारी (ता.सात) सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण १५० खाटा असून, त्यातील आय.सी.यू. खाटांची संख्या ५० आहे. यामध्ये ३० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

जालना - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर कष्ट घेत तयार करण्यात आलेले दीडशे खाटांचे स्वतंत्र कोरोना हॉस्पिटल मंगळवारी (ता.सात) सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना संशयितांचे अलगीकरण करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेजची इमारत ताब्यात घेण्यात आली होती.

हेही वाचा : जालन्यात आता गल्लोगल्ली लॉकडाऊन

गेल्या आठवड्यात नर्स व आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली. इमारतीत आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आली असून, मंगळवारी हे हॉस्पिटल कार्यान्वित झाले आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

या हॉस्पिटलमध्ये एकूण १५० खाटा असून, त्यातील आय.सी.यू. खाटांची संख्या ५० आहे. यामध्ये ३० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स, कंपाऊंडर, सफाई कामगारासह पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

पंधरा डॉक्टरसह ४० नर्स 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध २८९ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. यातील ४० स्टाफ नर्स आणि पंधरा वैद्यकीय अधिकारी कोरोना हॉस्पिटलमध्ये कर्तव्य बजावणार आहेत. याबरोबरच कंपाऊंडर, सफाई कामगारही या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. 

एक हजार पीपीईची मागणी 

डॉक्टर व परिचारिकेच्या सुरक्षिततेसाठी २०० पीपीई सूट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर एक हजार नवीन सूटची मागणी करण्यात आली आहे. तर ८० हजार एन-९५ व ट्रिपल लेयरच्या एक लाख मास्कचा पुरवठा जिल्हा सामान्य रुग्णालयाला झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Hospital in Jalna