जालन्यात आता गल्लोगल्ली लॉकडाऊन 

उमेश वाघमारे 
मंगळवार, 7 एप्रिल 2020

जालना शहरात अनेक ठिकाणी गल्लोगल्लीच लॉकडाऊन करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. गल्लोगल्ली काटेरी फांद्या टाकून रस्ते बंद केले जात आहेत. 

जालना - शहरात कोरोना बाधित महिला रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता शहरात अनेक ठिकाणी गल्लोगल्लीच लॉकडाऊन करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. गल्लोगल्ली काटेरी फांद्या टाकून रस्ते बंद केले जात आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ता.२२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, जालना शहरासह जिल्हात अनेकांकडून या लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

त्यामुळे आतापर्यंत शेकडो जणांवर लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सतत आवाहन करण्यात येत आहेत.मात्र, तरी देखील जालन्यात रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नव्हती. मात्र, सोमवारी (ता.सहा) शहरातील एक महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

परिणामी कोरोना विषाणू दारात आल्याने तो घरात येऊ नये, म्हणून आता नागरिक दक्ष झाले आहेत. शहरातील दुःखीनगर परिसर जिल्हा प्रशासनाने सील बंद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी अनेक गल्ल्या स्वतःहून बंद केल्या आहेत. अनेकांनी गल्लीत प्रवेश करताच्या मार्गावर काटेरी फांद्या, पत्रे लावून गल्लीतील प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गल्लोगल्ली खऱ्याअर्थाने लॉकडाऊन सुरू झाल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people take awareness about lockdown