उमरगा : सरपंचपदच ‘क्वारंटाईन’ झाल्याने इच्छूक ‘आयसीयू’मध्ये!

अविनाश काळे
Sunday, 20 December 2020

उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राथमिक रंगतदार चर्चेत कोरोना संसर्गाच्या काळात आलेल्या शब्दप्रयोगाचा वापर केला जातोय.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राथमिक रंगतदार चर्चेत कोरोना संसर्गाच्या काळात आलेल्या शब्दप्रयोगाचा वापर केला जातोय. निवडणूकीच्या निमित्ताने एकमेकांतील संवाद वाढतोय मात्र ‘मास्क’चा वापर कमी दिसतोय. दरम्यान सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर जाहीर होणार असल्याने सरपंचपद तूर्त ‘क्वॉरंइन’मध्ये असल्याने निवडणूकीदरम्यान इच्छुकांना आपापले ‘प्रतिबंधित क्षेत्र’ (वॉर्ड) शाबूत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.

 

ग्रामपंचायत निवडणूक म्हटल की, आघाडी तयार होण्यापासून मतदान होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असते. कोण म्हणतयं .. काय केलंय या सरपंचानं, तर दुसरा म्हणतोय केलयं की रं लेका डस्ट, सिमेंटचा रस्ता ... तिसरा म्हणतोय जाऊ द्या बाबा सगळं झालं, कोरोनाच्या काळात नातेवाईकांना क्वॉरंटाईन करुन लई ताप दिला. त्या सरपंचानं, पोलिस पाटलानं.... चौथ्या म्हणतो .. त्यात काय त्यांनी बरोबरच केलयं. त्यामुळे आपलं गाव सुरक्षित राहिलं. अशा अनेक रंगतदार चर्चा सध्या गुलाबी थंडीत मारुतीच्या वट्यावर, पानटपऱ्यावर सुरू झाल्या आहेत. वॉर्डाचे आरक्षण निश्चित असल्याने इच्छूक उमेदवारांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. घरपट्टी, नळपट्टीची थकबाकीची रक्कम भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ होत आहे. सर्वांची मनधरणी करण्यासाठी आघाडीच्या प्रमुखांचा जीवं कासाविसं होतोय.

 

मतदारांची ‘नाडी ओळखत वॉर्डाची सुरक्षितता’जपावी लागेल
सरपंचपदासाठी इच्छूक असणाऱ्यांना यंदा पहिल्यांदा मतदारांची नाडी ओळखत वॉर्डाची ‘सुरक्षितता’ जपावी लागणार आहे. स्पर्धेत उतरल्यानंतर बी.पी., शुगर वाढवणाऱ्या चक्रव्यूहातुन बाहेर पडण्यासाठी उमेदवारांचे ऑक्सिजन कमी होईल यासाठी ‘ऑक्सिमीटर’ची गरज पडणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. सरपंचपद तूर्त क्वॉरंटाईनमध्ये असले तरी आपल्या हक्काचा वॉर्ड जाता कामा नये. यासाठी इच्छुकांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रतिस्पर्धाची बाधा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सतर्कता ठेवली आहे. सरपंच होण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची अवस्था ‘आयसीयू’मध्ये असलेल्या रुग्णांसारखी झाली आहे. निदान तर होत आहे मात्र बरे झाल्यावर म्हणजे सरपंचपद दुसऱ्यासाठी आरक्षित झाल्यावर आयसीयूचा भला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता अनेकांना वाटते आहे. दरम्यान कोरोनाचा काळ अजून संपलेला नसल्याने सर्वांना  निवडणूकीच्या आचारसंहितेबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Infection Effect On Grampanchayat Election Umarga