एकीकडे कोरोना...तर दुसरीकडे भूकेचा झगडा

प्रमोद चौधरी
Monday, 20 April 2020

अनेक योजना तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतच नाहीत. हाच शेवटचा घटक लॉकडाउनच्या कचाट्यात अडकला असून भुकेसाठी अन्नाचा शोध घेत आहे. हा त्याच्या भूकेचा शोध शेजाऱ्यालाही घेता येत नाही, तर सरकार नावाच्या यंत्रणेला तरी घेता येणार काय? हा प्रश्न आहे.

नांदेड :  जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या प्रत्येकच प्राणिमात्रांना भूक लागते. रानावनात, दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या पशुपक्ष्यांची भूक माणसाला जाणवत नाही. मात्र, गरिबांना बाभूळबनातील काट्यांशी संघर्ष करूनही भूक भागविता येत नाही. कोणतेही सरकार असले तरी गरिबांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही. कारण केवळ राजकीय पोळी शेकण्यासाठी सरकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना गरीबच ठेवले जाते, हे वास्तव आहे. 

सद्यस्थितीत कोरोना संसर्गामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे टोकाच्या संघर्षालाही नवीन वळण मिळालेले आहे. अशावेळी चारभिंती आडच्या संघर्षाला कोणते नाव द्यावे? अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, भटक्या जमाती, वेगवेगळ्या उद्योगातील कामगार आणि हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती रेशनिंगच्या व्यवस्थेवरून सुधारू शकणार आहे काय? संघटितांचे जिथे हाल आहेत तिथे असंघटितांचे काय? भारतच काय जगभरात भूक हा चिंतेचा अन चिंतनाचा विषय सध्यातरी बनला आहे. 

येथे क्लिक करा - Video : खेळ मांडियेला...नेते लागले श्रेय लाटण्याच्या तयारीला
 
अन्नधान्यांचा पुरेसा साठा असताना भूक अस्वस्थ करीत असते. हा साठा काठीण्य पातळीवर जिंदगी जगणाऱ्यापर्यंत पोचला का?  एकीकडे कोरोनाचा लढा तर दुसरीकडे भुकेचा प्रश्न...हे दोन्ही लढे माणसासाठी माणसाने राबवायचे आहेत. जग सुस्थितीत असताना भुकेचा प्रश्न निर्माण होतो, तर आज संपूर्ण जगच बंद असताना हा प्रश्न किती बिकट असणार? याचा विचारही आपण करू शकणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी सरकार सर्वच प्रकारच्या उपोययोजना करीत आहे. भूकेने कोणाचाही मृत्यू होवू नये, कोणालाही संकटे निर्माण होऊ नये म्हणून पॅकेजही जाहीर केले. सरकारच्या उपाययोजनांबद्दल कोणताही संशय नाही. मात्र, या उपाययोजना कागदी घोडे नाचविणाऱ्या असतील तर त्या निश्चितच वेदनादायी आहेत. 

हे देखील वाचाच - रेल्वेकडून गरजूना अन्नधान्याची मदत

देशभरात लाॅकडाउन संचारबंदी लागू झाल्यानंतर रोजगार गेलेल्या कामगारांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला. कोट्यवधी मजूर, कामगारांनी आपल्या घरी जाण्यासाठी टोकाचे पाऊल उचलत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी सुरु केला. अडकून पडलेल्या लोकांना तिथले सरकार किंवा सामाजिक संघटना अन्नदान करतील. मात्र, आज शहरेची शहरे अन गावची गावे बंदस्थितीत आहेत. शहरातील झोपडपट्टी, गरीब वस्त्यांमध्ये स्वयंसेवी संघटना अन्न घेऊन पोहोचत असून गरिबांच्या भुकेचा प्रश्न सोडवीत आहेत. रस्त्यावरचा पोलिसही भुकेमुळे कासावीस झालेल्या भुकेल्यांना अन्नाचे पाकीटे देत आहेत. या भयावह संकटात माणुसकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

अदृश्‍य भूकेचा प्रश्‍न कायम
पण न दिसणाऱ्या भुकेच्या प्रश्नांकडे कोणाचे लक्ष आहे. नगरातील ठीक आहे, पण गावखेड्याचे काय? कोणाच्या घरात नसेल त्यांना रेशन मिळाले. मात्र त्यांच्याकडे रेशनचे धान्य घेण्यासाठी तरी पैसे आहेत काय? केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य जाहीर केले. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यात लाभार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले. कोणाकडे अन्नधान्य असेल तर कोणाकडे फोडणीसाठीही तेल नसेल, तिखट नसेल, कोणाकडे रेशन कार्ड नसेल तर रेशन तरी मिळणार काय?  कारण रेशन कार्ड नसणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी त्यांनी काय करावे? अन्नासाठी लोकांच्या रांगाच्या रांगा बघितल्या तर आपल्याला कल्पना येईल. मात्र त्या अदृश्य भूकेचे काय? हा प्रश्‍न अद्यापही कायमच आहे. 

भुकेचा सेन्सेक्स शोधण्याची गरज
संकट दुहेरी असले तरी बाजारातील सेन्सेक्ससारखा भुकेचा सेन्सेक्स शोधण्याची खरी गरज आहे. अन्यथा कोरोनाबळींपेक्षा इतर बळींची संख्या अधिक दिसण्याची शक्यता आहे. परंतु, अन्नपाण्याविना कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी सर्वांनीच लढण्याची गरज आहे, ती माणुसकीची.
- डॉ. राजेश्‍वरी कोथलकर (ज्येष्ठ नागरिक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona One Hand ...And Hunger Strikes Nanded News