एकीकडे ‘कोरोना’ दुसरीकडे उष्णतेची लाट, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा कहर आणि दुसरीकडे उष्णतेची लाट सुरु झाली असल्याने उकाडा असह्य होत चालला आहे. लॉकडाऊनमुळे कुलर, पंखे दुरुस्ती थांबली असल्याने परभणीकरांची घालमेल सुरु झाली आहे. 

परभणी ः एकीकडे ‘कोरोना’चा कहर आणि दुसरीकडे उष्णतेची लाट सुरु झाली असल्याने उकाडा असह्य होत चालला आहे. लॉकडाऊनमुळे कुलर, पंखे दुरुस्ती थांबली असल्याने परभणीकरांची घालमेल सुरु झाली आहे. परभणीचे तापमान दररोज वाढत चालले असून येत्या काही दिवसात तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरवर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक राहतो. हिवाळ्यात कधी दोन अंशावर तर कधी चार अंशावर पारा घसरतो. उन्हाळ्यात अगदी चंद्रपुर, वर्धा यांच्या बरोबरीने तापमान वाढलेले राहत आहे. गतवर्षी तापमान ४६ अंशावर पोचले होते. यंदा सततच्या ढगाळ वातावरणामुळे उशिरा तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. (ता.१३) एप्रिलपासून जिल्हा तापण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने उष्णतेची लाट सुरु झाली आहे. 

हेही वाचा - वादळी वाऱ्याचा फळबागांना फटका

कुलर लावण्याची हिंमत कोणी करेना 
सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा कडाका सुरु होत आहे. भर दुपारी अंग भाजणाऱ्या उष्णतेची लाट पसरत आहे. रात्रीच्या वेळी देखील उकाडा असह्य करणार आहे. दरवर्षी मार्च महिण्यात अडगळीला पडलेले कुलर बाहेर काढुन त्याची साफसफाई आणि नादुरुस्त असल्यास दुरुस्त करण्यात येते. थंडावा मिळण्यासाठी त्याचे वाळे बदलले जातात. तसेच कुणी नवीन कुलर, वातानुकुलीत यंत्र, पंखे खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. कुलर व्यवसायातून हाताला काम आणि नागरिकांना थंडावा मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे एप्रिल सुरु झाला तरी कुलर लावण्याची हिंमत कोणी करत नव्हते. 

जुने कुलर लावण्याशिवाय पर्याय नाही 
कोरोना विषाणुला रोखण्यासाठी थंड वातावरण ठेवु नका, असे यापुर्वी सांगितले जात असल्याने बहुतांष लोकांनी आपले एसी, कुलर बंद ठेवले होते. परंतु, आता उष्णतेची असह्य करणारी लाट सुरु झाल्याने आता एसी नाही तर किमान काही वेळासाठी कुलर लावणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नागरिक घरातील जुने कुलर लावत आहेत. परंतु, अनेकांचे कुलर नादुरस्त आहे. कुणाला नवीन घ्यायचे आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प असल्याने उकाडा सहन करण्याशिवाय पर्याय नाही. 

इलेक्ट्रिशियन देखील बाहेर पडण्यास टाळत आहेत 
कुलर दुरुस्ती, विक्री सुरु नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचे पंखेदेखील नादुरुस्त झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. अनेकांनी आपल्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला संपर्क साधुन नादुरुस्त पंखे, कुलर दुरुस्त करण्यास बोलवत आहेत. परंतु, कोरोनाच्या भीतीने कुणीही कुणाच्या घरी जाण्यास तयार नसल्याने दुरुस्त करणारे इलेक्ट्रिशियन देखील घराबाहेर पडण्यास टाळत आहेत. त्यामुळे घालमेल सहन करण्याशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा - परभणीत तीन दिवस संचारबंदी

लाखो रुपयांचे साहित्य पडून
अनेक इलेक्ट्रिशियन, कारागिरांनी मार्च महिण्यापुर्वी कुलरचे साहित्य खरेदी केले आहे. सर्वाधिक मागणी डेझर्ट कुलरला असल्याने या कुलरचे सुटे भाग आणुण कारागिर घरबसल्या असे कुलर तयार करुन विक्री करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची खरेदी करुन साहित्य आणले आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे मागणी असूनही कुलर तयार करता येत नाहीत आणि विक्री देखील होत नाही. त्यामुळे असे व्यावसायीक अडचणीत आले आहेत.

खरेदी केलेले साहित्य पडुन
दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुलरला मागणी असते. तसेच दुरुस्तीसाठी मोठी कामे येत असतात. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्ण ठप्प  झाला आहे. अनेक ग्राहकांचे फोन येत आहेत. कुलर, पंखे दुरुस्त करण्यासाठी मागणी येत आहे. परंतु, कोरोनामुळे घराबाहेर जाण्याचे टाळत आहे. हंगाम पाहुन फेब्रुवारी महिण्यात कुलरच्या सुट्या भागाची खरेदी केली आहे. त्यामुळे खरेदी केलेले साहित्य पडुन राहणार आहे. - श्रीकांत जोगदंड, इलेक्ट्रिशियन, परभणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 'corona' on the one hand, the heat wave on the other, read it where parbhani news