खुशखबर, जालन्यात २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह

महेश गायकवाड
मंगळवार, 24 मार्च 2020

परदेशातून जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. मंगळवारी (ता.२४) पर्यंत दाखल झालेल्या ४४ पैकी २७ जणांच्या नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. उर्वरित १७ जणांचे अहवाल आरोग्य विभागाला लवकरच प्राप्त होणार आहे. 

जालना - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी परदेशातून जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. मंगळवार (ता.२४) पर्यंत दाखल झालेल्या ४४ पैकी २७ जणांच्या नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. उर्वरित १७ जणांचे अहवाल आरोग्य विभागाला लवकरच प्राप्त होणार आहे. 

संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूविरोधात राज्यातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने विलगीकरण कक्षातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा :  रिकामचोटांच्या पार्श्‍वभागावर बसतायत फटके

सध्या दाखल असलेल्या ४४ रुग्णांपैकी २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली असून घरात अलगीकरण करून राहण्याचे सांगण्यात आले आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या जवळपास शंभर आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

दरम्यान विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या प्रत्येकाच्या लाळेचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत तपासण्यात येत आहे. नमुने घेऊन जाण्याची जबाबदारी रुग्णालयातील एक कर्मचारी करत असून ता.१४ मार्च पासून ते दररोज सहाशे किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून नमुने पोचवत आहेत. शासनाने एसटी तसेच खासगी बसेस बंद केल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नमुने पोच करणाऱ्या कर्मचाऱ्याला चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे. 

अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध तक्रार 

जालना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूची संदर्भात रक्ताची तपासणी उपलब्ध असल्याची अफवा व्हॉट्‌सअपर व्हायरल झाली. या प्रकरणी हॉस्पिटलच्या संचालकानी सायबर विभागाकडे तक्रार केली आहे. शहरातील कोणत्याही हॉस्‍पीटलमध्ये कोरोना विषाणूच्या संदर्भात कोणतेही तपासणी केल्या जात नाही. मात्र, एका नामांकित हॉस्‍पिटलमध्ये कारोनासंदर्भात रक्ताची तपासणी उपलब्ध असल्याचा मजकूर सोमवारपासून (ता.२३) व्हॉट्‌सअपवर व्हायरल होत आहे. या प्रकरणी हॉस्‍पीटलकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून सायबर विभागास याबाबत कळविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna