जालन्यात पुन्हा आठ कोरोनाबाधित 

महेश गायकवाड
Monday, 18 May 2020

जालन्यात रविवारी (ता.१७) पुन्हा आठ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सहाजण हे मुंबईहून परतले होते, तर अन्य दोन शहरातील एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जालना - जालन्यात रविवारी (ता.१७) पुन्हा आठ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सहाजण हे मुंबईहून परतले होते, तर अन्य दोन शहरातील एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आठ नवीन रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. ता. १३ मे रोजी शहरातील रामनगर येथे मुंबईहून आलेला एक युवक कोरोनाबाधित आढळून आला. त्याच्यासोबत आलेल्या सहाजणांचा अहवालही रविवारी पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

सहापैकी पाचजण हे घनसावंगी तालुक्यातील पीरगैबवाडी तर एकजण रांजणी येथील आहे. तर उर्वरित दोनजण हे शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. या हॉस्पिटलमधील एक डॉक्टर व प्रशासकीय अधिकारी ता. १५ मे रोजी पॉझिटिव्ह आढळून आले होते.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

तसेच कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या कानडगाव (ता.अंबड) व जालन्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण बाधित रुग्णांची संख्या २६ झाली आहे. 

जिल्ह्यात १ हजार ७१८ व्यक्ती कोरोना संशयित 

जिल्ह्यात एकूण १ हजार ७१८ व्यक्ती कोरोनाचे संशयित आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या ३३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी सात रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित २६ रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत 

जिल्ह्यात ४५६ जणांचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी ४५६ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात जालना शहरातील संत रामदास हॉस्‍टेलमध्ये ३४, डॉ. आंबेडकर हॉस्‍टेलमध्ये ७, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ६ व पोलिस प्रशिक्षण केंद्रात १०१ व्यक्ती अलगीकरणात आहेत. जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ३, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ४, तर टेंभुर्णीच्या राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे ९० व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबड तालुक्यातील डॉ. आंबेडकर हॉस्टेलमध्ये २४, तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १४ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. घनसावंगीतील डॉ. आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४१, तर अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ४५ व्यक्तींचे अलगीकरण केले आहे. भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात ६०, तर मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये २७ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

  • कोरोना अपडेट 
  • एकूण बाधित : ३३ 
  • बरे झालेले रुग्ण : ७ 
  • उपचार सुरू असलेले : २६ 
  • मृत्यू : एकही नाही 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna