‘कोरोना’च्या बंदोबस्तात चोरट्यांनी घेतले हात धुऊन, कुठे ते वाचा...  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

कळमनुरीत ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताची पडलेली मोठी जबाबदारी पाहता या मिळालेल्या संधीचे सोने करून घेण्याकरिता चोरटे सक्रिय झाले असून भर दुपारी वृद्धाच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी पळविण्याबरोबरच गोठ्यात बांधलेली गाय चोरी करण्याची घटना घडली आहे. 

कळमनुरी ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताची पडलेली मोठी जबाबदारी पाहता या मिळालेल्या संधीचे सोने करून घेण्याकरिता चोरटे सक्रिय झाले असून भर दुपारी वृद्धाच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी पळविण्याबरोबरच गोठ्यात बांधलेली गाय चोरी करण्याची घटना घडली आहे. त्यामुळे रात्रंदिवस बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या मागे चोरी तपासाचे काम लागले आहे.

‘कोरोना’मुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांची अडचण होणार नाही याकरिता जीवनावश्यक वस्तूंच्या अस्थापना सुरू आहेत. एक दिवसआड ठराविक वेळेत नियमांचे पालन करून भाजीपाला व किराणा दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बंद दरम्यान, जीवनावश्यक वस्तूच्या आस्थापना सुरू असल्यानंतर व नंतरचा पूर्णवेळ पोलिस प्रशासन रात्रंदिवस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे आहे. 

हेही वाचा -  ‘कोरोना’ रिलीफ फंडासाठी सरसावले मदतीचे हात

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला 
नागरिकांची गर्दी टाळण्याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरून वाहतुकीकरिता परवानगी देण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करण्याचे कामही पोलिसांना २४ तास करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे. नेमकी हीच वेळ ओळखून काही चोरटेही सक्रिय झाले आहेत. रविवारी (ता. २९) औषधी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या बाबूराव सदावर्ते या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला बसस्थानकाच्या परिसरातच भरदुपारी चोरट्याने धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी पळविली. 

हेही वाचा - गहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्‍टरने

सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू 
याच दिवशी सायंकाळी उशिरा इंदिरानगर भागात राहणाऱ्या व दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विनोद सूर्यभान कोपले यांची घरासमोर असलेल्या गोठ्यात बांधलेली गाय चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. भर दुपारी वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची पळविणाऱ्या युवकाला अनेकांनी पाहिले व ओळखल्‍याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सोमवार (ता. ३०) सदावर्ते यांच्या तक्रारीवरून सोन्याची साखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून या फुटेजमध्ये सदरील चोरट्याची ओळख पटविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the 'Corona' settlement, thieves wash their hands, read where ..., hingoli news