esakal | गहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्‍टरने 
sakal

बोलून बातमी शोधा

harvestor

गिरगावसह परिसरातील गावांमध्ये गहू काढणीच्या कामास मजूर मिळत नसल्याने ठप्प पडत असलेली कामे आता हार्वेस्‍टरने केली जात आहेत. यामुळे गहू काढणीच्या कामाने वेग घेतला आहे. गिरगाव येथे हार्वेस्‍टरच्या मदतीने गहू काढणीची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गहू काढणीसाठी मजूरांची जागा घेतली हार्वेस्‍टरने 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गिरगाव ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गहू काढणीच्या कामास मजूर मिळत नसल्याने हार्वेस्‍टरच्या मदतीने गहू काढणीच्या कामांना वेग आला असून एकरी अठराशे रुपये मजूरी घेतली जात आहे. कामे उरकण्यासाठी हा पर्याय सध्या शेतकरी अवलंबत आहेत.  

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संचारबंदी असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. शहरी भागात याचा परिणाम जसा जाणवतोय तसाच परिणाम ग्रामीण भागात झाल्याचे पहावयास मिळते. शेतात काढणीस आलेला गहू, फळबागांसह भाजीपाल्यांचे देखील नुकसान होत आहे. शेतातील कामे करण्यास मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. 

मजूरांची कटकट नको म्हणून असा उपाय
दररोज वातावरणात होत असलेला बदल पाहता गहू काढणीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, मजुरांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागात हार्वेस्‍टर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी देखील मजूरांची कटकट नको म्‍हणत हार्वेस्‍टरने गहू काढणीला सुरवात केली आहे. 

हेही वाचा - लातूरच्या ऊसतोड मजूरांवर तामिळनाडूमध्ये उपासमारीची वेळ, शासनाकडून मदतीची अपेक्षा

या भागात कामे सुरू 
गिरगावसह परजना, खाजमापुर वाडी, बोरगाव खुर्द, बोरगाव बुद्रुक, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द आदी भागात गहु काढण्यास सुरुवात झाली. हार्वेस्‍टरच्या मदतीने एकरी अठराशे रुपये घेतले जात आहेत.  दरवर्षी या भागात बाहेर गावातील मजूर गहु काढणीसाठी येतात. या वेळी कोरोना रोगाच्या संसर्गामुळे मजुरांनी याकडे पाठ फिरविली आहे. गुजरात, राजस्थान या राज्यातून काही महिण्यापासून आलेले हार्वेस्‍टर चालक सध्या या भागात गव्हाच्या काढणीची कामे करीत आहेत. 

हेही वाचा - कोरोना विरोधात लढण्यात रेल्वे विभाग सक्रिय

एका एकरातील गहू वीस मिनिटात काढला जातोय
हार्वेस्‍टरने एका एकरामधील गहू पंधरा ते वीस मिनिटात काढला जात आहे. दिवसभरात वीस ते पंचवीस एकरातील गहु यातून निघत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत झाली असून काम देखील त्‍वरीत होत असल्याने अनेकांनी हार्वेस्‍टरच्या काढणीवर भर दिला आहे. मजुरांमार्फत ही कामे करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, हार्वेस्‍टरमधून पंधरा ते वीस मिनिटात काम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.