आता स्वॅबची तपासणी लातुरातच होणार; साथरोग निदान प्रयोगशाळा सुरू

सुशांत सांगवे
Sunday, 26 April 2020

कोरोनाचे तपासणी अहवाल लवकर मिळावेत म्हणून शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये साथरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे यापुढे कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी सोलापूर ऐवजी लातुरातच होणार आहे

लातूर : कोरोनाचे तपासणी अहवाल लवकर मिळावेत म्हणून शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये साथरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे यापुढे कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी सोलापूर ऐवजी लातुरातच होणार आहे. पहिल्या दिवशी (ता. 25) तीन व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून या तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने रुग्णांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी साथरोग निदान प्रयोगशाळा ठिकठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने ठिकठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करायला सुरवात केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातुरसाठी प्रयोगशाळा मंजूर केली. याबाबतची आयसीएमआर कडून परवानगी मिळाल्यानंतर अखेर लातुरात शनिवारी ही प्रयोगशाळा सुरू झाली. याआधी पुण्यातील प्रयोगशाळेत आणि त्यांनतर सोलापुरातील प्रयोगशाळेत लातुरातून रुग्णांचे स्वॅब तपासणी पाठवले जात होते. आता यापुढे लातुरातच तपासणी होईल.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शनिवारी (ता. 25) सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत एकुण 50 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तर आजपर्यंत एकुण 6 हजार 356 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकुण 207 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 199 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

पॉझिटीव्ह आलेल्या 8 रुग्णांचे उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. आजपर्यंत 167 व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे. 31 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तर 9 व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षप्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Swab Testing Lab Started In Latur