CoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू

हरि तुगावकर
Wednesday, 2 December 2020

लातूर  जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला.

लातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात कोरोनामुळे मृत्यूची एकूण संख्या ६५० वर गेली आहे. त्यात कोणताही आजार नसताना १७६ जण दगावले आहेत. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात बुधवारी आणखी ५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २१ हजार ९२६ वर गेला आहे. त्यात २० हजार ९१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३६१ रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.

कोरोनाचे उपचार सुरु असताना आणखी तीघांचा बळी गेला. त्याचे अहवाल बुधवारी आले. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ६५० वर गेला आहे. या मृतांपैकी ४७४ जणांना विविध आजार होते तर १७६ जणांना काहीही आजार नसताना त्यांचा कोरोनाचे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. एकूण मृतापैकी ७० वर्षापेक्षा जास्त वय असलेले २६६, ६० ते ७० वर्ष वय असलेले २०१, ५० ते ६० वर्ष वय असलेले ९८ तर ५० वर्षापेक्षा कमी असलेले ८५ रुग्णाचा समावेश आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकाच दिवसात मृत झालेले ४७, एक ते पाच दिवस उपचार घेवून मृत झालेले ३२४, पाच ते दहा दिवस उपचार घेऊन मृत झालेले १६५ व दहा दिवसापेक्षा जास्त दिवस उपचार घेवून मृत झालेल्यांची संख्या ११४ आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आक्टोबरपासून घट होत आहे. पण दररोज सरासरी ५० ते ७० जणांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही लातूरकरांवर घोंगावत आहे. हे लक्षात घेऊन नागरीकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे अशा उपाय योजनाचा अवलंब करण्याची गरज आहे.

लातूर कोरोना मिटर
एकूण बाधित --२१९२६
उपचार सुरु असलेले ३६१
बरे झालेले--२०९१५
मृत्यू--६५०
 

Edited - Ganesh Pitekar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Take 650 People Lives In Latur District