कोरोना अपडेट : मुंबईहून आलेले चारजण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

जिल्ह्यातील क्‍वारंटाइन सेंटरअंतर्गत एकूण तीन हजार ८७६ संशयितांना भरती करण्यात आले आहे. त्‍यापैकी तीन हजार ४३६ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ६५२ संशयित भरती आहेत. तर २३० संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हिंगोली : तालुक्‍यातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथील दोन व्यक्‍ती, वसमत येथील २४ वर्षीय पुरुष व राज्य राखीव पोलिस दलातील एक जवान, असे चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून गुरुवारी (ता.१८) कळमनुरी येथील एका कोरोनामुक्त रुग्णाला घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर दोन संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. यातील एक रुग्ण २३ वर्षीय पुरुष असून तो संतुकपिंपरी येथील रहिवासी आहे, तर दुसरा रुग्ण १४ वर्षीय मुलगा असून कनेरगाव नाका येथील रहिवासी आहे. 

हेही वाचाअजबच... शाखा नसलेल्या बॅंकेला जोडले गाव -

दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले

दोन्ही रुग्ण मुंबईहून हिंगाली तालुक्‍यात आलेले आहेत. तसेच वसमत येथील क्‍वारंटाइन सेंटरमधील २४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले. हा रुग्ण बुधवारपेठ भागातील असून मुंबईहून आलेला आहे.

एसआरपीएफ जवानाचा समावेश

 तसेच हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक बारा येथील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. हा जवान मुंबईहून आलेला आहे. येलकी येथील सशस्त्र सीमा बलातील क्‍वारंटाइन सेंटरमध्ये भरती होता.

२०१ रुग्ण कोरोनामुक्त

 पुढील उपचारासाठी डेडिकेटेड कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे भरती करण्यात आले आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर अंतर्गत जांब रुग्ण बरा झाल्याने त्‍याला घरी सोडण्यात आले आहे. जिल्‍ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ झाली असून त्‍यापैकी २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तीन हजार ८७६ संशयित भरती 

जिल्‍ह्यांतर्गत आयसोलेशन वार्ड व जिल्‍ह्यातल सर्व कोरोना केअर सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्‍वारंटाइन सेंटरअंतर्गत एकूण तीन हजार ८७६ संशयितांना भरती करण्यात आले आहे.

२३० संशयितांचा अहवाल प्रलंबित

 त्‍यापैकी तीन हजार ४३६ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तीन हजार २०२ जणांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या ६५२ संशयित भरती आहेत. तर २३० संशयितांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.

येथे क्लिक कराकोरोनाने रोखली ‘जलयुक्त’ची १३३ कामे -

गिरगाव झाले कोरोनामुक्‍त

गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव कोरोनामुक्त झाले असून बहिर्जी स्मारक विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. येथे एका जावयासह त्यांची पत्नी कोरोनाबाधित निघाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

सर्वांचे अहवाल निगेटिव्ह 

प्रशासनाने येथे कंटेनमेंट झोन केले होते. तसेच गावात हैदराबाद, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे कामासाठी गेलेले ग्रामस्थ आले होते. त्यांना येथील बहिर्जी स्मारक विद्यालयात क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून गाव कोरोनामुक्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update: Four Corona Victims From Mumbai Hingoli News