कोरोना अपडेट : हिंगोलीत आणखी दोन रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना कोरोना झाल्याचा अहवाल शुक्रवारी (ता.१२) प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २२४ झाली आहे. त्‍यापैकी १८३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्‍यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्‍थितीत ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली : वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना कोरोना झाल्याचा अहवाल शुक्रवारी (ता.१२) प्राप्त झाल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. यातील एक वीस वर्षीय रुग्ण व्यक्‍ती कुरेशी मोहल्‍ला येथील मृत्‍यू झालेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहे. दुसरा रुग्ण पंचवीस वर्षीय महिला असून सम्राट कॉलनीतील रहिवासी आहे. ही महिला मुंबईहून आलेली आहे.

हिंगोली जिल्‍ह्यात आपर्यंत कोरोनाचे २२४ रुग्ण झाले आहेत. त्‍यापैकी १८३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्‍यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्‍थितीत ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाच रुग्ण उपचार घेत असून हयातनगर येथील तीन, कुरेशी मोहल्‍ला एक, सम्राट कॉलनीतील एका रुग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा शिवसांब घेवारे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर -

आयसोलेशन वार्डात ३० रुग्ण

कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाच रुग्ण असून यात जाब एक, दाती येथील तीन व डोंगरकडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. डेडीकेट कोवीड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे एक कोरोनाचा रुग्ण असून तो एसआरपीएफ जवान आहे. हिंगोली येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात एकूण ३० कोरोना रुग्ण आहेत.

तज्ज्ञ पथकामार्फत औषधोपचार 

 यात चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला बाजार दोन, नगरपरिषद कॉलनी चार, कलगाव सहा, सिरसम बुद्रुक एक, ब्राम्‍हणवाडा एक, सुकळी वळण एक, खानापूर एक, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक, कमलानगर एक या रुग्णांचा समावेश आहे. त्‍यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय पथकामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 

येथे क्लिक कराCOVID-19 : हिंगोलीत नवे बारा रुग्ण; जिल्ह्यात पहिला बळी -

१९१ जणांचा अहवाल येणे प्रलंबित

आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण दोन हजार ७४६ कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्‍यापैकी दोन हजार २७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोन हजार २६९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्‍थितीत ४५३ जण भरती आहेत. आजतर १९१ जणांचा अहवाल येणे प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. 

सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे

दरम्‍यान, अंत्यत महत्‍वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अत्‍यावश्यक सेवा वगळता इतरानी घरीच थांबून सहकार्य करावे, तसेच सर्व नागरिकांनी मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे, जेणेकरून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते असे आवाहन डॉ. श्रीवास यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update: Two More Patients Added To Hingoli Hingoli News