शिवसांब घेवारे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

राजेश दारव्हेकर
Thursday, 11 June 2020

हिंगोली पोलिस दलातील श्री. घेवारे यांनी गडचिरोली परिक्षेत्रामध्ये तीन वर्षे अतिशय खडतर सेवा बजावत अनेक आदिवासी तरुणांना नक्षली मार्गावरून परावृत्त केले. त्यांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन पोलिस दलामध्ये भरती होण्यास सहकार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत श्री. घेवारे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे.

हिंगोली : येथील स्‍थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी गडचिरोली जिल्‍ह्यात केलेल्या कौतुकास्‍पद कामगिरीबद्दल त्‍यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे.

हिंगोली पोलिस दलातील श्री. घेवारे हे गडचिरोली परिक्षेत्रामध्ये तीन वर्षे अतिशय खडतर सेवा बजावत अनेक आदिवासी तरुणांना नक्षली मार्गावरून परावृत्त करून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन पोलिस दलामध्ये भरती केले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर -

रस्ते, पाण्याच्या सुविधेसाठी प्रयत्न

 तसेच अनेक गावे नक्षलमुक्त करण्यास पुढाकार घेतला. नक्षल फंडाअंतर्गत अनेक गावांत रस्ते व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. दिवाळीनिमित्त अनेक आदिवासी पाड्यांवर नवनवीन कपडे व मिठाईचे वाटप केले. शाळेमध्ये मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेचे धडे रुजविले, अनेक गावे दारूमुक्त केली आहेत. 

नक्षलवाद्यांचे हत्यारे जप्त

तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनेक बेरोजगार आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिवाय १५ जानेवारी २०१७ रोजी छत्तीसगड बॉर्डरवर नक्षलवाद्यांशी यशस्वी गोळीबार करून नक्षलवाद्यांचे हत्यारे जप्त केली. जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी समाजबांधवांची प्रशासनाप्रती आस्था निर्माण केली. 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्‍कार 

पोलिस कॅम्‍प पिंपरीयातर्फे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री. घेवारे, सतीश घुगे, सागर पडवळ व इतर कर्मचाऱ्यांनी पिंपरीया हायस्‍कूल व आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्‍कार करण्यात आला. यामुळे नक्षलग्रस्‍त भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत झाली. 

अधिकाऱ्यांनी कामाचे केले कौतूक

सध्या स्‍थानिक गुन्हे शाखेतदेखील त्‍यांचा दबदबा आहे. गुप्त माहितीच्या आधारे त्‍यांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून अनेकांना पळताभुई थोडी करून टाकली आहे. त्यांनी गडचिरोली जिल्‍ह्यात केलेल्या कामगिरीची दखल घेत तत्कालीन पोलिस महासंचालक सतीश माथुर, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, के. कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी पिपरीया पोलिस स्टेशनला भेट देऊन सदर कामाचे कौतुक केले होते. 

येथे क्लिक कराइसापूर धरणात ३३ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध -

जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे अभिनंदन

सदर कामाबद्दल पोलिस उपनिरीक्षक श्री. घेवारे यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्वर व्यंजने, अश्विनी जगताप, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार आदींनी श्री. घेवारे यांचे अभिनंदन केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsamba Gheware Awarded Internal Security Medal Hingoli News