Corona Vaccine: कोविशिल्ड लस लातुरात दाखल; शनिवारपासून लसीकरण मोहिम

विकास गाढवे
Wednesday, 13 January 2021

लसीच्या उपलब्धतेमुळे आरोग्य विभागाने शनिवारपासून (ता. 16) जिल्ह्यातील आठ केंद्रावर प्रायोगिक तत्वावर दररोज शंभर लसीकरणाची तयारी केली आहे.

लातूर: कोरोना प्रतिबंधक व बहुचर्चित कोविशिल्ड लस बुधवारी (ता. 13) सायंकाळी येथे दाखल झाली. लातूर आरोग्य परिमंडळाअंतर्गत (विभाग) येणाऱ्या लातूरसह चार जिल्ह्यांसाठी आलेल्या 66 हजार लसीचा साठा आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर ही लस जिल्ह्यांसाठी लागलीच रवाना करण्यात आली. लसीच्या उपलब्धतेमुळे आरोग्य विभागाने शनिवारपासून (ता. 16) जिल्ह्यातील आठ केंद्रावर प्रायोगिक तत्वावर दररोज शंभर लसीकरणाची तयारी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करची निवड करण्यात आली असून त्यात सरकारी व खासगी रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह कोरोना रूग्णांच्या समोर जाऊन तसेच शेवटच्या पातळीवर जाऊन काम करणाऱ्या आरोग्य व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांनाही लस देण्यात येणार आहे.

प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत अब्दुल सत्तारांनी धनंजय मुंडेंची केली पाठराखण

या लसीकरणासाठी लाभार्थींची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी लसीची प्रतीक्षा होती. मंगळवारी (ता. 15) देशभरात लसीचे वितरण सुरू झाल्यानंतर बुधवारी सर्व जिल्ह्यांत लस येणार असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे आरोग्य विभागाकडून लसीची सकाळपासूनच प्रतीक्षा सुरू होती. आरोग्य विभागातील चार जिल्ह्यांसाठी सकाळीच लस निघाली. वाटेत येताना विभागातील बीड जिल्ह्याला लस देण्याचे नियोजन करण्यात आले.

 नंतर लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यासाठीची सायंकाळी येथे लस दाखल झाल्याचे उपसंचालक डॉ. माले यांनी सांगितले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी बरूरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विभागातील लसीकरणाची स्थिती
जिल्हा - लाभार्थी - उपलब्ध लस
लातूर - 16953 - 20980
बीड - 15851 - 17640
नांदेड - 14257 - 17330
उस्मानाबाद - 8707 - 10050

ठेकेदाराचा दोष नागरिकांच्या मूळावर! शहराच्या बाह्य वळण रस्त्याचे कॉर्नर ठरतायेत अपघाताचे केंद्र

शनिवारी आठ केंद्रावर लसीकरण-
शनिवारी सकाळी नऊपासून जिल्ह्यातील आठ केंद्रावर लसीकरणाला सुरवात होणार आहे. यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पीटल, उदगीर व निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालय, अहमदपूर, मुरूड व औसा येथील ग्रामीण रूग्णालयातील केंद्राचा समावेश असल्याचे डॉ. देशमुख सांगितले. यासाठी 445 लस टोचक व त्यांना मदत करणाऱ्या 205 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका केंद्रावर दररोज शंभर जणांना लस देण्याचे नियोजन असून लस साठवणुकीसाठी 68 शितसाठवण केंद्र तयार ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccine in latur corona virus vaccination starts soon