कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधित आदेश - कुठे ते वाचा 

नवनाथ येवले
Monday, 16 March 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक, मालक यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हााधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही‍. शिंगणे, जिल्हा महिला बाल कल्यााण अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक, मालक यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमांची परवानगी रद्द
शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा मंगळवारपासून (ता. ३१) लागू केला आहे. त्यानुसार शनिवारपासून (ता. १४) कोव्हीड - १९ उपाययोजना नियम २०२० लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपंचायत क्षेत्रातील, सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, सर्व सरकारी व खासगी शाळा, तसेच महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था मंगळवारपर्यंत (ता. ३१) बंद ठेवण्याबाबत सांगितले.

हेही वाचा -  Video : आठवडे बाजारावर ‘कोरोना’चे सावट- कुठे ते वाचा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.

अडथळा आणण्याविरुद्ध कार्यवाही
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान, दुध, भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून) मंगळवारपर्यंत (ता. ३१) बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेशित केले. मागील १४ दिवसात ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे, त्यांनी स्वत: याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२० - २६१२७३९४ एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष ०२०-२७२९००६६ टोल फ्री क्रमांक १०४ किंवा जिल्हा रुग्णालयातील नियंत्रण कक्ष ०२४६२ - २४९२७९ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे. त्यास मज्जाव, प्रतिबंध, अडथळा आणण्याविरुध्द दंडनीय कार्यवाहीचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

येथे क्लिक करा - Corona Virus : ‘करोना’मुळे व्यापार, लघुउद्योग संकटात

अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई
कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॅानिक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशीर व दंडनीय कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions for preventing coronary infection - read where, Nanded News