रेल्वे स्थानकासह शहरातील भिक्षेकरी बेवारस

प्रमोद चौधरी
Wednesday, 25 March 2020

रुपया, दोन रुपये मागून मंदिराबाहेर हताश दिसणारे वृद्धांचे ते चेहरे बघितले की हृदयाची कालवाकालव होते. केवळ नांदेड शहरच नव्हे तर सर्वत्र असे दुःखी आयुष्य नशिबी आलेले अनेक जण आहेत.

नांदेड : विषाणूने अहंकारी माणसाला चांगलच भानावर आणलं आहे. त्याला जीवन कसं क्षणभंगूर आहे हे आता उमगलं आहे. स्वतःसह कुटुंबाला विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी तो अनेक बचावात्मक प्रयोग करतो आहे. मात्र ज्याचं जगनंच बसस्थानक, मंगलकार्यालये अथवा मंदिराच्या गाभाऱ्यापुढे बसण्यावर अवलंबून आहे, त्या भिक्षा मागून जगणाऱ्या भिक्षेकऱ्यांच्या टिचभर पोटाच्या खळगीचे काय हा प्रश्न संवेदनशील मनाला आज सतावतो आहे.

अनेकांची दैनंदिनी आजही उघड्यावरच नियती अनेकदा काहींच्या आयुष्यासोबत वेगळाच खेळ खेळते. कुणी भौतिक सुखाच्या समृद्धीत लोळतोय, तर कुणी अठराविश्व दारिद्र्याचे चटके भोगतोय. हजारो स्क्वेअर फुटाच्या संगमरवरी महालात आयुष्य व्यतीत करणारे गर्भश्रीमंत तर दुसरीकडे फआटक्या लक्तरांना अनवाणी पायाने फिरणआरे दारिद्र्य नारायण या दोघांचे जगणे बघितले की, विषमतेची दाहकता लक्षात येते.

मानसिक भान हरपलेले अनेक जण चक्क बस, रेल्वे स्थानकावर

आजही अनेकांच्या डोक्यावर आभाळाचे छत आहे. अनेकांना राहायला घरे सुद्धा नाहीत. मुलांनी घराबाहेर हाकलून दिलेले, परिस्थितीने मानसिक भान हरपलेले अनेक जण चक्क बस, रेल्वे स्थानकावर आपली दिनश्चर्या व चरितार्थ चालवितात. रुपया, दोन रुपये मागून मंदिराबाहेर हताश दिसणारे वृद्धांचे ते चेहरे बघितले की हृदयाची कालवाकालव होते.

हेही वाचाखाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन,  निराधार व्यक्तींना दिले जातेय अन्न

ज्यांच्याकडे घरेच नाही त्यांनी थांबायचे कुठे?

केवळ नांदेड शहरच नव्हे तर सर्वत्र असे दुःखी आयुष्य नशिबी आलेले अनेक जण आहेत. देह लपवायला नाही हक्काचे घर कोरोना विषाणूच्या संसर्गाची त्यांना जाणीव सुद्धा नाही. अनेकांना जाणीव असली तरी देह लपवायला हक्काचे घर सुद्धा नाही. पंतप्रधानांनी मंगळवारी (ता.२४ मार्च २०२०) १५ एप्रिलपर्यंत लाॅक डाऊन करून घराबाहेर न पडण्याचे देशवासियांना आवाहन केले. मात्र, ज्यांच्याकडे घरेच नाही त्यांनी थांबायचे कुठे? हा प्रश्न संवेदनशील मनाला भेडसावत आहे. या देशात पूर्वी जातीपातीची असमानता होती. आजही वर्णाश्रमाचा अभिमान बाळगणारे भरपूर आहेत. मी अमक्या जातीचा, मी तमक्या जातीचा हा अहंकार घेऊन जगणाऱ्या सुशिक्षितांची संख्या कमी नाही. गरीब भिकाऱ्यांनी जायचे कुठे?

कोरोना विषाणूने सगळ्यांना जमिनीवर आणले

मात्र, कोरोना विषाणूने सगळ्यांना जमिनीवर आणले. कोरोना कधीही श्रीमंत, गरीब हा भेद पाहणार नाही, जो त्याच्या तावडीत सापडला त्याला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही. सध्या काही खासदार, आमदार अन सोशल मीडियावर समाजसेवेचे वेश पांघरणारे नागरिकांना घरातच बसण्याचा सल्ला देत आहेत. त्यांचा तो सल्ला योग्यही आहे. मात्र, ज्या भिकाऱ्यांना सुरक्षेची कुठलीही व्यवस्था नाही, साधे अंगभर वस्त्र देखील नाही, अशांसाठी समाजसेवेचा पुळका दाखविणारे ही मंडळी काही जमिनीवर उतरून करणार आहे का? या गरीबांनाही तुमच्यासारखा मास्क हवा आहे. त्यांनाही सॅनिटायझर हवे आहेत. मात्र, ते केवळ गर्भश्रीमंतांसाठीच जर उरले असेल तर गरीब भिकाऱ्यांनी जायचे कुठे हा प्रश्नच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus Nanded News