कोरोना वॉरिअर्स : मग स्टूल पायाखाली घेऊन जॉली म्हणतो, ''डॅडा आजा ना...''

दत्ता देशमुख
Friday, 17 April 2020

दोघे रोज एकमेकांना दिसतात आणि भेटतातही, पण असेच दहा फुट अंतरावरुन. कारण, कोरोना रोखायचा तर सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागेल. म्हणूनच  बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित बडे आणि त्यांचा मुलगा अर्णव उर्फ जॉली यांच्यात महिन्याभरापासून हे अंतर आलं आहे.

बीड : दोनही वर्ष पूर्ण न झालेल्या अर्णव आणि पप्पांच्या लाडल्या जॉलीला आता पप्पांना पहायचे असेल, तर पायाखाली स्टुल घ्यावा लागतोय. सोशल डिस्टन्सिंगमुळे या बाप-लेकाच्या प्रेमात दहा फुटांचं अंतर आणि दोन लोखंडी जाळ्यांचे कुंपण आणले आहे. आपले वडील तिकडे का राहतात, याचे कारण माहीत नसले, तरी हा जॉली स्टुल पायाखाली घेऊन, ''डॅडा आजा, डॅडा आजा ना...'' म्हणतो.

दोघे रोज एकमेकांना दिसतात आणि भेटतातही, पण असेच दहा फुट अंतरावरुन. कारण, कोरोना रोखायचा तर सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागेल. म्हणूनच  बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित बडे आणि त्यांचा मुलगा अर्णव उर्फ जॉली यांच्यात महिन्याभरापासून हे अंतर आलं आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी आदी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस रस्त्यावर आहेत. पोलिसांमुळे सामान्यांना बाहेर निघण्याची भिती वाटतेय. परंतु, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी व पोलिस या कोरोना वॉरिअर्सना घरी/कुटूंबात जाण्याची भिती आहे. अनेकांनी स्वत:ला कुटूंबापासून अलग करुन घेतले आहे. तसेच, बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत बडे देखील महिन्यापासून कुटूंबापासून दुरच आहेत. 

मित्राच्या फ्लॅटमध्ये ते स्वतंत्र राहतात

शहरातील सारडा रेसीडन्सीमध्ये ते भाड्याने राहतात. परंतु, महिनाभरापासून ते आता ड्युटीवरुन आल्यानंतर स्वत:च्या घरी जात नाहीत. त्यांच्या बिल्डींगच्या समोरच असलेल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये ते स्वतंत्र राहतात. त्यांना दोन वर्षाचा अर्णव उर्फ जॉली हा मुलगा आहे.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

वडील ड्युटीवरुन आले, की अंगाला बिलगून खेळत पप्पांचे मुके घेणाऱ्या आणि मस्ती करणाऱ्या अर्णवला आता वडिलांना पहायचे असेल, तर पायाखाली स्टुल घ्यावा लागतो. कारण, दोघांचे फ्लॅट समोरासमोर असल्याने एकमेकांना पाहण्यासाठी खिडकी तर आहे. परंतु, अर्णवची उंची खिडकीपर्यंत पोचण्यासाठी त्याच्या पायाखाली स्टुल ठेवावा लागतो. तेथूनच अर्णव म्हणतो, ''डॅडा आजा, डॅडा आजा ना...'' 

या बापलेकांत हा सकाळ-संध्याकाळ संवाद घडतो, नजरानजर होते. परंतु, भेटू शकत नाहीत. घरी फोन आला तरी अर्णव सांगतो ‘माझा डॅडा तिकडे राहतो’. आता त्याचा डॅडा घरी का येत नाही, दिसतो पण भेटत का नाही याची जाणिव या कोवळ्या जिवाला नाही. परंतु, कोरोला हरवायचे तर सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागणार, म्हणून सुजीत बडे काळजावर दगड ठेवून कोवळ्या अर्णवपासून दुर आहेत.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

पण, आपल्यासाखे कळते लोक मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. यावर सुजीत बडे म्हणतात, ''तुमच्या आमच्या लढयाला एक दिवस निश्चित यश येईल, आपण कोरोनाला नक्की हरवूच.... पण ह्या चिमुकल्याला "माझा डॅडा तिकडे का राहतो" हे समजायला खूप वेळ लागेल. तुम्हाला तरी समजतेय म्हणून तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा. घरी रहा सुरक्षित रहा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Warriors In Beed Rural Police News