बीड जिल्ह्यात कोरोना शून्यच, पुन्हा नऊ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

बीड जिल्ह्यात आजघडीला १८५ जण क्वारंटाइन आहेत, तर ४० हजारांवर ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्याची तपासणी व उपचार नगरलाच झाले.

बीड - संशयितांच्या स्वॅबच्या तपासणीचा निगेटिव्ह अहवाल येण्याचा जिल्ह्यातील सिलसिला कायम असून, सोमवारी (ता. चार) पाठविलेल्या नऊ स्वॅबचे निगेटिव्ह अहवाल मंगळवारी (ता. पाच) प्राप्त झाले. आतापर्यंत २१० जणांच्या २२४ स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, सर्वच अहवाल निगेटिव्ह आले. 

दरम्यान, जिल्ह्यात आजघडीला १८५ जण क्वारंटाइन आहेत, तर ४० हजारांवर ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्याची तपासणी व उपचार नगरलाच झाले. उपचारानंतर सदर व्यक्ती बरा झाली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत २१० जणांच्या स्वॅबची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

१४ जणांचे स्वॅब दुबार घेण्यात आले. त्याचे अहवालही निगेटिव्ह आले. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून आतापर्यंत १७२ स्वॅब तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातून ५२ स्वॅब तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११८ जण विदेशातून आले आहेत. मात्र, सर्वजण आता क्वारंटाइनमधून बाहेर आले आहेत. तर, परजिल्ह्यातून आलेले सध्या ६२ जण होम क्वारंटाइन असून १२१ जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत. तर, मंगळवार सायंकाळपर्यंत ४० हजार ३७२ ऊसतोड मजूर जिल्ह्यात परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona zero in Beed district, again nine swab reports negative