Breaking News - अखेर बीडमध्येही कोरोनाची एंट्री; दोन पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

मुंबईहून गेवराई तालुक्यातील इटकूर येथे आलेल्या एका मुलीस आणि माजलगाव तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ३९० लोकांचे ४०४ स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते.

बीड - आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना उत्तम राबवीत कोरोनाला जिल्ह्याच्या वेशीत आडविण्यात यशस्वी झालेल्या जिल्ह्यात अखेर कोरोनाने चोरमार्गाने प्रवेश केला. मुंबईहून विनापरवाना जिल्ह्यात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान शनिवारी (ता. १६) झाले. 

एक इटकूर (ता. गेवराई) येथील मुलगी असून, दुसरा रुग्ण हिवरा (ता. माजलगाव) येथील आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्याने आदर्श पॅटर्न राबविल्यानेच मागचे दोन महिने जिल्हा कोरोनामुक्त राहिला. यापूर्वी असेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केलेल्या पिंपळा (ता. आष्टी) येथील एकास कोरोनाची लागण झाली होती; मात्र त्याची तपासणी व उपचार नगरलाच झाले होते.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

तीन आठवड्यांपूर्वीच सदर व्यक्ती उपचारानंतर बरा झाला. त्यानंतरही जिल्ह्यात कोरोनाला शिरकाव करता आला नाही; मात्र अलीकडे बाहेरजिल्ह्यांत अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यास मुभा देण्याचा निर्णय झाला. त्यातच काही लोक विनापास चोरमार्गाने परतत आहेत. असेच मुंबईहून गेवराई तालुक्यातील इटकूर येथे आलेल्या एका मुलीस आणि माजलगाव तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून ३९० लोकांचे ४०४ स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यातील ४०२ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले, तर प्रलंबित असलेल्या दोन स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's entry into Beed too; Two positive

Tags
टॉपिकस
Topic Tags: