Video : ‘कोरोनाने’ कोमेजली फुले ! 

कृष्णा पिंगळे
Saturday, 11 April 2020

एरवी फुलांच्या शेतात गेल्यावर मनप्रसन्न करणारे विलोभनीय दृश्य दिसते. परंतु, कोरोनाच्या लॉकडाउन पार्श्वभूमीवर फुलांच्या शेतात गेल्यावर मात्र, मन विषन्न करणारे चित्र पहावयास मिळत आहे. मन प्रफुल्लित करणारी फुले जागेवरच सुकून गळून पडत आहेत. 

सोनपेठ (जि.परभणी) : कोरोनाच्या लॉकडाउनचा सर्वात गंभीर परिणाम फुलशेतीवर झाला असून या लॉकडाउनमुळे फुलशेती करणारे शेतकरी संपूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे.  एरवी फुलांच्या शेतात गेल्यावर मनप्रसन्न करणारे विलोभनीय दृश्य दिसते. परंतु, कोरोनाच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या शेतात गेल्यावर मात्र, मन विषण्ण करणारे चित्र पहावयास मिळत आहे. मन प्रफुल्लित करणारी फुले जागेवरच सुकून गळून पडत आहेत.

सोनपेठ तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध फुले लावण्याचा धाडसी प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना चांगले यश ही मिळाले. मोठा आर्थिक फायदादेखील झाला. परंतु हाच वेगळा प्रयोग आता कोरोनामुळे त्यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे. ग्रामीण भागात कोरोना लॉकडाउनचा फारसा परिणाम जाणवत नाही. ग्रामीण भागात ग्रामस्थ नित्यनियमाने आपल्या शेतावर जाऊन शेतीतील कामे करत आहेत. परंतु, या कोरोनामुळे मात्र, फुलशेतीवर मोठा परिणाम झालेला आहे. वीस दिवसांपासून फुलांना मागणीच नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने फुले जागेवरच गळून पडत आहेत. 

हेही वाचा व पहा -  Video:जप्त केलेले वजन काटे पळविले

फुले गळून पडतात
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ (ई) येथील अनेक शेतकरी आपल्या शेतात मोगरा, निशिगंध, जरबेरा, अस्टर आदींसह डच गुलाब, शिर्डी गुलाब, गावरान गुलाब यासह अनेक शोभिवंत फुलांची पिके घेतात. 
स्थानिक बाजारपेठेसह परळी, अंबाजोगाई, लातूर आदी ठिकाणच्या बाजारपेठेत ते आपली फुले विक्रीसाठी पाठवतात. ता. २० मार्चपासून या फुलांना मागणी नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी फुलतोड बंद केली आहे. वीस दिवसांपासून फुललेल्या फुलांची तोड बंद केल्याने आता ही फुले जागेवरच सडत असून आपोआप गळून पडत आहेत. 

शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट
या फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपली फुले बाजारात पाठवून सर्व खर्च वजा जाता दररोज किमान एक ते दोन हजार रुपये शिल्लक राहत होते. परंतु या लॉकडाउनमुळे लग्नसराईचा मुख्य हंगाम त्यांच्या हातातून जात असूनही लग्नसराई डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या फुलशेतीचे नियोजन करत असतात. या सर्व कोरोनाच्या महासंकटामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ऐन हंगामात सर्वत्र बंद झाल्याने या फुल उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतीसह फुलांवर पाणी सोडावे लागल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. 
 

कर्जाचा डोंगर उभा राहणार
लॉकडाउनमुळे वीस दिवसांपासून फुलतोड करता आली नाही. फुलशेतीसाठी कर्ज काढून मोठा खर्च केला होता. येत्या काळात लग्नसराई चालू होणार आणि फुलांची विक्रीदेखील मोठी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार असून आहेत ती फुले देखील जागेवरच सडत आहेत. 
-सुनील गायकवाड, फुलउत्पादक शेतकरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Coronation' flowers blossoming!,parbhani news