शेतात पडून टरबुजे सडणार, मालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

येडशी (ता. उस्मानाबाद) येथील गुरुनाथ पताळे यांनी चार जानेवारी रोजी त्यांच्या दोन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी ठिबक, मल्चिंग, मजुरी, बेणे, खत फवारणीसह सुमारे दोन लाख १० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे मालही चांगला लागला. १५ मार्चलाच माल तयार झाला आहे. 

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच स्तरावर होत असून शेतमाल उचलला जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे बाजारात माल येत नसल्याने नागरिकांना चढ्या दराने माल खरेदी करावा लागत आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण अर्थकारण ठप्प केले आहे. यामध्ये सर्वच स्तरावरील नागरिकांना याचा फटका बसला आहे. शेतकरी वर्गही यातून सुटलेला नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांनी टरबूज, खरबूजाची लागवडी केली आहे. शिवाय त्याची फळेही विक्रीसाठी आली आहेत. मात्र या मालाचा उठावच होत नाही. 

एकट्या  उस्मानाबाद तालुक्यात दररोज 100 ते 150 टन माल विक्री होतो. पण, सद्या 10 टनही माळ जात नाही. नाशवंत असल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. माझ्याकडे सध्या 40 टन माल तयार आहे. त्यातून 15 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. 
- शाम जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी.

बाजारपेठ ठप्प असल्याने व्यापारी माल खरेदी करीत नाहीत. तर शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः टरबूज, खरबूज, द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माल तयार आहे. परंतु, उठाव नसल्याने जागेवरच सडून जात आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

येडशी (ता. उस्मानाबाद) येथील गुरुनाथ पताळे यांनी चार जानेवारी रोजी त्यांच्या दोन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी ठिबक, मल्चिंग, मजुरी, बेणे, खत फवारणीसह सुमारे दोन लाख १० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे मालही चांगला लागला. १५ मार्चलाच माल तयार झाला आहे. 

जवळपास ५५ टन टरबूज मालाचे उत्पादन होईल, अशी स्थिती आहे. मात्र बाजार नसल्याने सध्या व्यापारी येत नाहीत. टरबूजाच्या वेलाचा जीवनकाळ संपला आहे. त्यामुळे वेल वाळत आहेत. त्यातच उन्हाचा चटका वाढल्याने टरबूज जाग्यावर फुटत आहेत. तर काही माल जाग्यावर सडू लागला आहे. म्हणजे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड असून मोठे आर्थिक संकट कोसळले असल्याचे पताळे सांगतात. 

तीन रुपये किलोने व्यापारी टरबूज मागत आहेत. तेही फोनवरच विचारणा करीत आहेत. शिवाय शेताच्या बाहेर माल काढून द्यावा लागेल. वाहनात भरावा लागेल, अशी अट घातली जात आहे. एवढे करूनही व्यापारी माल घेऊन जायला येत नाहीत. आमचा माल पुढे जात नसल्याने कुठे न्यावा, अशी त्यांना भिती असल्याने जाग्यावरच माल खराब होत आहे. 
- गुरुनाथ पताळे, शेतकरी, येडशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Effect On Market Agriculture Osmanabad News