शुभमंगल सावधान म्हणताच नववधूवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

सोहळा आयोजित करून गर्दी जमवू नका, असा आदेश सरकारने दिलेला असतानाही त्याला केराची टोपली दाखवत चक्क महापालिकेच्या जागेवर विनापरवाना विवाह सोहळा आयोजित करून गर्दी जमविल्याप्रकरणी वधु-वर, दोघांचे आई-वडिल यांच्याबरोबरच भटजी आणि मंडपवाल्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) गुन्हा दाखल केला. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे.

लातूर : सोहळा आयोजित करून गर्दी जमवू नका, असा आदेश सरकारने दिलेला असतानाही त्याला केराची टोपली दाखवत चक्क महापालिकेच्या जागेवर विनापरवाना विवाह सोहळा आयोजित करून गर्दी जमविल्याप्रकरणी वधु-वर, दोघांचे आई-वडिल यांच्याबरोबरच भटजी आणि मंडपवाल्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) गुन्हा दाखल केला. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे.

हेही वाचा- तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

विवाह सोहळा हा आयुष्यात कायम लक्षात राहणारा क्षण. पण, याच दिवशी वधु-वराबरोबरच आठ जणांना पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली आहे. सिग्नल कॅम्प भागातील विवेकानंद रुग्णालयाच्या बाजूला पालिकेच्या जागेत विनापरवाना मांडव टाकून शिंदे-मगर परिवाराने आज दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांना विवाह सोहळा आयोजित केला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिस विवाहस्थळी पोहोचले. तोपर्यंत वधु-वरावर अक्षता पडल्या होत्या. लग्नसोहळ्यात १०० ते १५० जणांची गर्दी जमा झाली होती.

त्यामुळे पोलिसांनी सुरज खंडू शिंदे (वर) निकीत नरसिंग मगर (वधू), मुलाचे वडिल खंडू विठ्ठल शिंदे, आई शालू, वधूची आई उषा आणि वडिल नरसिंग हरी मगर यांच्याबरोबरच झुंजारे मंगलसेवा केंद्र आणि भटजीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संजय शरद कुलकर्णी (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस निरिक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरिक्षक राजेश घाडगे यांच्यासह बालाजी म्हस्के, गोविंद चामे, चंदर जाधव, रमेश कांबळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हे वाचलंत का?- मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Latur News FIR Registerd Bride Maharashtra