esakal | बीड : गावाकडे निघाले, तपासणीत अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

संचारबंदी सुरू असताना अनेकजण आपापल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये मिळेल त्या वाहनाने मिळेल त्याप्रकारे अनेक जण गावाकडे जाताना दिसून येत आहेत. मंगळवारी महामार्ग पोलिसांनी कंटेनरमधून प्रवास करताना पकडलेल्या ३२ जणांना चौसाळा येथील नवगण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे. 

बीड : गावाकडे निघाले, तपासणीत अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेकनूर (बीड) : महामार्ग पोलिसांनी कंटेनरमधून अवैध प्रवास करणाऱ्या ३२ जणांना मंगळवारी (ता. ३१) पकडले होते. त्यांना चौसाळा येथील महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे, तर उत्तर प्रदेशकडे पायी निघालेल्या १३ जणांना नेकनूर येथे थांबवून ठेवण्यात आले. या सर्वांची प्राथमिक तपासणी बुधवारी (ता.एक) व गुरुवारी (ता.दोन) करण्यात आली. या सर्वांमध्ये कसल्याही प्रकारचे आजाराचे लक्षण दिसून आले नाही.

संचारबंदी सुरू असताना अनेकजण आपापल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये मिळेल त्या वाहनाने मिळेल त्याप्रकारे अनेक जण गावाकडे जाताना दिसून येत आहेत. मंगळवारी महामार्ग पोलिसांनी कंटेनरमधून प्रवास करताना पकडलेल्या ३२ जणांना चौसाळा येथील नवगण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व सोय सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत चौसाळा व ग्रामस्थ मिळून करत आहेत. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खाकरे यांनी केली. त्यामध्ये त्यांना सर्दी-खोकला, ताप यापैकी कोणतेही आजाराचे लक्षण दिसून आले नाही. पण खबरदारी म्हणून पुढील १४ दिवस त्यांना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी स्वतः तहसीलदार किरण आंबेकर यांनी मध्यरात्री भेट देऊन गरजूंना मदत केली. 

त्याचप्रमाणे मंडळाधिकारी वंजारे, तलाठी ढाकणे, श्री. राऊत, श्री. केकाण हेसुद्धा या ठिकाणी हजर होते. दुसरीकडे कळंब येथून उत्तर प्रदेशकडे पायी निघालेल्या १३ जणांना नेकनूर इथेच थांबवून ठेवण्यात आले आहे. येथील शेख राजू यांच्या शेतात त्यांना ठेवण्यात आले असून येळंबघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. 

त्यांच्यामध्येसुद्धा सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यांनासुद्धा या ठिकाणी पुढील चौदा दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यांची सर्व व्यवस्था नेकनूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. याचदरम्यान लिंबागणेशजवळ बुधवारी रात्री बारा जणांना अवैधरीत्या प्रवास करताना पकडले होते. त्यांची रवानगी गुरुवारी बीड येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आली.