पांढऱ्या सोन्याची १९ लाख क्विंटलवर खरेदी !

कैलास चव्हाण
मंगळवार, 17 मार्च 2020


परभणी, हिंगोली जिल्ह्यात सीसीआय आघाडीवर

परभणी : पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाची यंदाच्या हंगामात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय आणि खासगी व्यापारी यांनी आतापर्यंत १९ लाख ६१ हजार १४०.०५ क्विंटलची खरेदी केली आहे. कापूस खरेदीमध्ये सीसीआय आघाडीवर आहे.

गतवर्षी खरीप हंगामात लागवड केलेल्या कापसाची आवक गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. जानेवारी महिन्‍यात कापसाची पुन्हा आवक वाढली. कापसाच्या खरेदीसाठी शासनाने कापूस पणन महासंघ, सीसीआयच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाची परभणी, गंगाखेड, पाथरी तालुक्यात १३ खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत पाच लाख ३५ हजार ३५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

हेही वाचा - बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

१३ खरेदी केंद्र
भारतीय कापूस निगम महामंडळ अर्थात सीसीआयच्या परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, पूर्णा, ताडकळस, जिंतूर, सोनपेठ येथील सात केंद्रांतर्गत आठ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर, हिंगोली या केंद्रांवर एक लाख ९५ हजार ८६५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अशी एकूण दहा लाख ८४ हजार ३५७ क्विंटल कापूस आहे. सेलू केंद्रावर चार लाख ८० हजर २७६ क्विंटल, मानवत केंद्रावर दोन लाख १३ हजार क्विंटल, पूर्णा केंद्रावर २५ हजार ३९६ क्विंटल, ताडकळस केंद्रावर ४२ हजार २१३ क्विंटल, जिंतूर केंद्रावर एक लाख १३ हजार ६३१ क्विंटल, करम (सोनपेठ) केंद्रावर २५ हजार ६७६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. हयातनगर (वसमत) केंद्रावर एक लाख ९५ हजार ८६५ क्विंटल, हिंगोली केंद्रावर ९१ हजार ८८३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

हेही वाचा - ‘बुलेट’वरून नर्मदा परिक्रमा !

व्यापाऱ्यांकडून मोठी खरेदी
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांतर्गत खासगी व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी बाजार समितीअंतर्गत सहा लाख सात हजार ०७ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. त्यासाठी कापसाची प्रतवारी पाहून चार हजार ७०० रुपये ते पाच हजार २०० रुपये एवढ्या दराने कापसाची खरेदी केली आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्यांनी पाच लाख ९३ हजार ९८३ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यात १३ हजार २४ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. परभणी जिल्ह्यात १९ लाख ६१ हजार १४०.०५ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यात दोन लाख ६५ हजार २५९.२५ क्विंटल, अशी एकूण २२ लाख २६ हजार ३९९.३० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton purchases at 19 lakh quintals!