कपाशी, सोयाबीन पाण्यात; शेतकऱ्यांनी शेतातील पावसाचे पाणी काढण्यासाठी लावले वीजपंप

बाबासाहेब गोंटे
Monday, 5 October 2020

अंबड तालुक्यातील बनटाकळी, कासारवाडी, नारायणगावसह परिसरात पावसाने सतत धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची पुरती नासाडी झाली आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यात सततच्या पावसाने शेतकरी पुरता भुईसपाट झाला आहे. तालुक्यातील बनटाकळी, कासारवाडी, नारायणगावसह परिसरात पावसाने सतत धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची पुरती नासाडी झाली आहे. या वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पांढरे सोनं व नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूस लागवडीचे क्षेत्र कमी करून कमी खर्चात व कमी कालावधीमध्ये येणाऱ्या सोयाबीन पिकाला अग्रक्रमाने प्राधान्य दिले आहे.

दिव्यांगांचे 'भीक मागो' आंदोलन, औसा नगरपालिका घेणार का दखल?

या वर्षी पावसाळाच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याच्या खरीप हंगामात उत्पन्नाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. योग्य मृग नक्षत्रामध्ये खरिपाची पेरणी केली. सुरवातीला पावसामुळे मूग, उडीद, कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिके जोमात आली होती. मात्र त्यानंतर झालेली अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे उभ्या पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. पावसाने सतत धुमाकूळ घातल्याने उभ्या पिकांत पाण्याचे पाट साचले आहे.

यामुळे कपाशी, सोयाबीन, तुरी आदी पिके लाल, पिवळी पडली आहेत. कपाशीच्या झाडाची बोंड फुटण्यापूर्वीच कैऱ्या सडून गेल्या आहे. खरीप पिकाबरोबर फळबागेला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील बनटाकळी, कासारवाडी, नारायणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीनची पिके पाण्यात बुडाली आहे. शेतात उभ्या पिकांत साचलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी बनटाकळी येथील शेतकरी महावीर गव्हाणे यांनी वीजपंप लावून उभ्या पिकातील पाणी बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र आटापिटा सुरु केला आहे.

रक्ताचा तुटवडा भासला आणि ५१ तरुणांनी केले तातडीने रक्तदान

 

शेतात सोयाबीन, कपाशीचे जोमात आलेले उभे पिकांची डोळ्यादेखत नासाडी होत चालली आहे. यामुळे विजेचा पंप लावुन पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रब्बीच्या पेरणीची मशागतीची कामे करणे तर दूरच राहिली आहे.
- महावीर गव्हाणे, शेतकरी, बनटाकळी

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton, Soybean In Water, Farmers In Trouble Ambad News