नशा व सेक्स वाढविण्याची बनावट औषधी जप्त 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 8 एप्रिल 2020

नशेची, सेक्स वाढविण्याची आणि झोपेची बनावट औषधीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाने केळी मार्केट परिसरात बुधवारी (ता. आठ) दुपारी केली.

नांदेड : विनापरवानगी बेकायदेशीररित्या नशेची, सेक्स वाढविण्याची आणि झोपेची बनावट औषधीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाने केळी मार्केट परिसरात बुधवारी (ता. आठ) दुपारी केली. पोलिसांनी ही औषधी विक्री करणाऱ्यास अटक केली आहे. 

कोरोना या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी तमाम पोलिस यंत्रणा बंदोबस्तावर तैणात असल्याचा फायदा घेऊन काही अवैध धंदेवाले आपले काळे कारनामे करत उखळ पांढरे करुन घेत आहेत. मात्र अशा लोकांवर पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे बारीक लक्ष ठेवून आहेत. 

हेही वाचामेहनतीला रान मोकळ हायं, पण ‘फळा’च काय...?

सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाची कारवाई

शहरातील व जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधात शहरातून शासकिय वाहनाने  गस्त घालत असतांना सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती हे आपले सहकारी यांना घेऊन इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले होते. त्यांना मिळालेल्या गुपत माहितीवरुन त्यांनी मोठ्या शिताफिने आपल्या वरिष्ठांना कळवून केळी मार्केट, भंगार लाईन, शक्तीनगर परिसरातील एका दुकानावर छापा टाकला. या दुकानाला नाव नाही किंवा त्या ठिकाणी दुकान चालविण्याचा कुठलाच परवाना नसल्याचे त्यांना समजले. दुकान मालक ज्ञानेश्‍वर संगनवार याला ताब्यात घेतले.

येथे क्लिक कराआमदार कल्याणकरांनी ‘या’ बँक मॅनेजरला सुनावले

९० हजाराच्या ७५० बॉटल जप्त

त्यानंतर दुकानाची झडती घेतली असता कागदी बॉक्समधील विनापरवाना नशेची, सेक्स वाढविण्याची आणि झोपेची औषधी (९० हजार) रुपयाच्या जवळपास साडेसातशे बॉटल जप्त केल्या. औनरेक्स व रेक्सुलर अशी बनावट कंपनीची औषधी जप्त केली. ही सर्व औषधी जप्त करुन श्री. संगनवार याला ताब्यात घेऊन हे पथक पोलिस अधिक्षक कार्यालयत आले. त्यानंतर औषधी विभागाचे निरीक्षक माधवराव निमसे यांना बोलावून घेऊन त्यांच्या समक्ष पोलिसांनी पंचनामा करून आरोपीसह जप्त बनावट औषधी रात्री उशिरा श्री. निमसे यांच्या ताब्यात दिली.

इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा 

औषधी निरीक्षक माधवराव निमसे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात ज्ञानेश्‍वर संगनवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्दर्शनाखाली इतवारा पोलिस करत आहेत. पोलिस पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि श्री. चिखलीकर यांनी कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit drugs seized to promote drugs and sex nanded news