मेहनतीला रान मोकळ हायं, पण ‘फळा’च काय...?

कृष्णा जोमेगावकर
बुधवार, 8 एप्रिल 2020

पिकविलेले कडधान्य वगळता भाजीपाला, फळे बाजार, दळणवळण बंद असल्याने जागेवरच सडून जात आहेत. हे पाहून शेतकऱ्यांवर हाती आलेले उत्पादन डोळ्यांदेखत मातीमोल होताना पाहण्याची वेळ आली आहे.

नांदेड ः कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर अख्खा देश लॉकडाउनमध्ये आहे. यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, पिकविलेले कडधान्य वगळता भाजीपाला, फळे बाजार, दळणवळण बंद असल्याने जागेवरच सडून जात आहेत. हे पाहून शेतकऱ्यांवर हाती आलेले उत्पादन डोळ्यांदेखत मातीमोल होताना पाहण्याची वेळ आली आहे. ‘मेहनतीला रान मोकळ हायं, पण ‘फळा’च काय..?’ असा केविलवाना प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

चार-पाच वर्षापासुन संकट
मागील चार-पाच वर्षांचे चित्र पाहता, शेतकऱ्यांवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने संकटाची कुऱ्हाड कोसळत आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी, तर कधी गारपीट हे शेतकऱ्यांसाठी यमराजासारखे धावून येत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असून त्याचे जनजीवन विस्कळित होत चालल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा....लातूरचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणतात, बिनधास्त वाचा वृत्तपत्र !

अतिवृष्टीने गेले धुवून
कोरडा दुष्काळ संपला म्हणताच पुन्हा पावसाचा कहर. 
सतत चार वर्षांच्या कोरड्या दुष्काळाने मागील वर्षींच्या खरीप हंगामात पाठ फिरवल्याने उत्पन्न चांगले होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद काढणीच्या तोंडावरच जवळपास एक महिना अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे हाताशी आलेली पिके चिखलात मिसळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही काढणे शक्य झाले नाही. उलट जमिनीत तण जास्त होऊन, जमीन वाफस्यावर लवकर आली नसल्याने, मजुरांअभावी रब्बी पेरणीलाही बराच उशीर झाला.

हेही वाचलेच पाहिजे.... १०८ जणांना अटक, २२ लाखाचा मुद्देमाल जप्त- निलेश सांगडे

रब्बी पिकांवरही ओढवले आवकाळीने संकट
उशिरा झालेल्या रब्बीच्या पेरणीमुळे रब्बी पिके परिपक्व होण्यासाठीही उशीरच झाला आहे. त्यात आता मागील तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळीचा, तर काही ठिकाणी गारपिटीचा फटका या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे काहीच चीज झाले नाही. गहू, टाळकी ज्वारी आडवी पडून मातीत मिसळली आहे. तर फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. भाजीपाला पाण्याने सडून जात आहे.

भाजीपाला, फळांना लॉकडाउनचा फटका 
सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे शेतात काढणीस आलेला भाजीपाला व फळे ग्राहकांअभावी जागेवरच पडून आहे. काही तुरळक व्यापारी माल घेण्याची तसदी दाखवतात मात्र, तेही दर पाडून. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करून माल विकावा लागतो, तर बराच भाजीपाला, फळे वेळेवर ग्राहक मिळाले नसल्यामुळे फेकूनही द्यावा लागत आहे.

शासन शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतंय, पण..? 
शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. हे संकट असह्य झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी  आत्महत्या करून आपले जीवनही संपविले आहे. या शेतकऱ्यांना धीर देऊन या संकटातून सावरण्यासाठी शासन अनेक योजनांद्वारे प्रयत्न करीत आहे. त्यांच्यापर्यंत विविध योजनांद्वारे पोचून त्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र, माहितीअभावी अजूनही यातील बऱ्याच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाहीत. काही सुशिक्षित शेतकरी तेवढे या योजनांचा पुरेपुर वापर करून घेत आहेत. मात्र, अनेक अशिक्षित शेतकरी आजही या योजनांपासून कोसो दूरच आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hard work deserts, but what about 'fruits'?, nanded news