गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त

नवनाथ इधाटे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील कृष्णपूर येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 12) पकडले असून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

फुलंब्री, ता. 12 (बातमीदार) : फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील कृष्णपूर येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 12) पकडले असून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीत पिस्तूल सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद तालुक्‍यातील कृष्णपूर येथील चरणसिंग श्‍यामसिंग काकरवाल हा पिस्तूल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुदे यांनी पोलिस उपनिरीक्षक श्री. सोळंके यांच्या नेतृत्वाखाली विषेश पथक तयार केले. सर्व माहिती जमा करून कृष्णपूर येथे गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी दाखल झाले. संबंधित संशयित गावात दाखल होताच त्याच्या घरारावर पोलिसांनी छापा टाकला,

या घराची झडती घेतली असता पार्किंगमध्ये वाळूच्या गंजात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून चरणसिंग काकरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंके, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल राख, श्री. भालेराव, धीरज जाधव, दिपेश नागझरे, रामेश्वर धापसे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Country made pistols sized