चारचाकी, दुचाकीवरून देशी दारूचे बारा बॉक्‍स जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

खोडेगाव (ता. औरंगाबाद) येथे चारचाकी वाहनातून बारा बॉक्‍स व एका दुचाकीवरून एक बॉक्‍स देशीदारूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करीत बॉक्‍ससह चारचाकी व दुचाकी जप्त करून सुमारे पाच लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह दोन जणांना मंगळवारी (ता.एक) पोलिसांनी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी व चिकलठाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

करमाड (जि.औरंगाबाद ) : खोडेगाव (ता. औरंगाबाद) येथे चारचाकी वाहनातून बारा बॉक्‍स व एका दुचाकीवरून एक बॉक्‍स देशीदारूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करीत बॉक्‍ससह चारचाकी व दुचाकी जप्त करून सुमारे पाच लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह दोन जणांना मंगळवारी (ता.एक) पोलिसांनी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी व चिकलठाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

यात गणेश साळुंके (रा.आडगाव, ता.औरंगाबाद) व राजू गीतखाने (रा.कचनेर, ता.औरंगाबाद) या दोन आरोपींना या पथकाने ताब्यात घेऊन सरकारतर्फे चिकलठाणा पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद उपविभागीय पोलिस अधिकारी व तालुक्‍यातील संबंधित पोलिस ठाणे यांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. या पथकांची तालुक्‍यातील निवडणुकीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर आहे. मंगळवारी गस्तीवर असताना चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीतील खोडेगाव-पाचोड रस्त्यावरून दोघेजण अवैध दारू वाहतूक करीत असल्याची खबर मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी व चिकलठाणा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता खोडेगाव (ता.औरंगाबाद) या गावातील रेणुका मंदिराजवळील खोडेगाव-पाचोड रस्त्यावर गणेश साळुंके हा त्याच्या कारमधून (एमएच-16, बीवाय-4227) 11 बॉक्‍स देशी दारू ज्यात 383 बाटल्या व राजू गीतखाने याच्या दुचाकीवर (एमएच-20, डीके-8967) एक बॉक्‍स भिंगरी संत्रा जातीची देशी दारू वाहतूक करताना आढळून आला.

यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर चेळेकर यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, सहायक फौजदार करंगले, प्रेम म्हस्के, श्री. पुंगळे, भूषण देसाई, अनिल जायभाये आदींनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Country Side Alcohol Seized